घरातील स्वयंपाकघरात प्रत्येक वस्तू योग्य ठिकाणी ठेवणं महत्त्वाचं मानलं जातं. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात ठेवलेले धान्य, मसाले आणि लहान उपकरणांचाही घरातील सकारात्मक ऊर्जेवर परिणाम होतो. त्यामुळे मसाल्यांचे डबे आणि धान्य साठवताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
मसाल्यांचे डबे कोणत्या दिशेला ठेवावेत?
वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघराच्या नैऋत्य किंवा पश्चिम दिशेला धान्य आणि मसाल्यांचे डबे ठेवणं योग्य मानलं जातं. यामुळे घरात स्थिरता आणि भरभराट राहण्यास मदत होते, अशी मान्यता आहे.
डबे ठेवताना कोणती काळजी घ्यावी?
धान्य आणि मसाले ठेवण्यासाठी नेहमी स्वच्छ आणि कोरड्या डब्यांचा वापर करावा. हे डबे जमिनीवर न ठेवता कपाटातील वरच्या कप्प्यांमध्ये ठेवावेत. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते, असं वास्तुशास्त्रात नमूद करण्यात आलं आहे. मसाले आणि धान्य साठवण्यासाठी काचेचे डबे वापरणं चांगलं मानलं जातं. यामुळे त्यांचा ताजेपणा टिकून राहण्यास मदत होते. तसेच नकारात्मक ऊर्जा तयार होण्यापासून बचाव होतो, अशी मान्यता आहे.
स्वयंपाकघरातील सामान अस्ताव्यस्त ठेवू नये. मसाले आणि धान्याचे डबे व्यवस्थित लावून ठेवावेत. जुने, खराब झालेले किंवा मुदत संपलेले पदार्थ वेळोवेळी काढून टाकावेत. यामुळे स्वयंपाकघरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह चांगला राहतो.
मसाले किंवा धान्याचे डबे पूर्ण रिकामे ठेवणं टाळावं. प्रत्येक डब्यात थोडं तरी धान्य किंवा मसाले असावेत. वास्तुशास्त्रानुसार रिकामा डबा हे कमतरतेचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे घरात भरभराट राहावी यासाठी डब्यांमध्ये थोडे पदार्थ ठेवावेत.
स्वयंपाकघरातील साठवणुकीच्या जागेत काही लवंगा किंवा खडे मीठ ठेवावं. यामुळे नकारात्मक ऊर्जा शोषली जाते आणि स्वयंपाकघरातील वातावरण स्वच्छ आणि सकारात्मक राहण्यास मदत होते, असं वास्तुशास्त्रात सांगितलं जातं.
या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply