मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारे आरोप केले आहेत. आपल्याविरोधात बोलण्यासाठी आश्रमशाळा आणि गोशाळेच्या खात्यांवर पैसे पाठवले जात असल्याचा गंभीर दावा त्यांनी केला आहे. आपली बदनामी करण्यासाठी आर्थिक रसद पुरवली जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी मनोज जरांगे पाटील आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विविध मुद्द्यांवर भाष्य केले. आपल्याविरोधात जाणीवपूर्वक षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
आश्रमशाळा आणि गोशाळेच्या खात्यांचा उल्लेख
काही लोकांना आपल्याविरोधात बोलण्यासाठी पैसे दिले जात असल्याचा दावा जरांगे यांनी केला. आश्रमशाळा आणि गोशाळेच्या खात्यांवर पैसे पाठवून त्यांच्यामार्फत आपल्याविरोधात वक्तव्ये केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. खोट्या क्लिप आणि बनावट व्हिडिओ तयार करून जनतेमध्ये आपली प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना इशारा
मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट इशारा दिला आहे. यापूर्वी समोर आलेल्या पहिल्या क्लिपमधील लोकांचा शोध घेऊन त्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. संबंधित लोक भाजपचेच असल्याचे मान्य करा, असे आव्हानही त्यांनी दिले. मराठा आरक्षण आंदोलन चिरडण्यासाठी पडद्यामागे नियोजन करण्यात आल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.
आंदोलनाची ताकद कमी करण्यासाठी आणि आंदोलनकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून प्रयत्न सुरू असल्याचा त्यांचा दावा आहे. यापुढे समोर येणारी क्लिप आणखी धक्कादायक असेल, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. त्यामुळे या प्रकरणात आणखी कोणती नावे समोर येणार आणि त्यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Leave a Reply