धुळे : युडायस प्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे आधार प्रमाणीकरण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना यंदाच्या २०२६-२७ शैक्षणिक वर्षाच्या संचमान्यतेत ग्राह्य धरावे, अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मागील वर्षी आधार प्रमाणीकरण नसलेल्या विद्यार्थ्यांना संचमान्यतेतून वगळण्यात आले होते. त्यामुळे अनेक शाळांमधील विद्यार्थी संख्या कागदोपत्री कमी दाखवली गेली आणि परिणामी अनेक शाळांची शिक्षक पदे कमी मंजूर झाली, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
लहान मुलांच्या ठशांची अडचण
विशेषतः पहिली आणि दुसरीच्या लहान बालकांच्या बोटांचे ठसे उमटण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि नाव तसेच जन्मतारखेतील किरकोळ तफावतीमुळे हे प्रमाणीकरण रखडते, असे संघटनेने म्हटले आहे.
हे विद्यार्थी नियमित शिक्षण घेत असून त्यांना गणवेश, पाठ्यपुस्तके आणि पोषण आहारासारखे सर्व लाभ मिळत असताना संचमान्यतेत त्यांना डावलणे विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
ऑफलाइन पडताळणीची मागणी
त्यामुळे गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत अशा विद्यार्थ्यांची ऑफलाइन पडताळणी करून त्यांना संचमान्यतेत ग्राह्य धरावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील आणि सरचिटणीस हरीश ससनकर यांच्या मार्गदर्शनात शासनास या मागणीचे निवेदन देण्यात आले. याची माहिती राज्य प्रमुख संघटक तथा जिल्हाध्यक्ष भूपेश वाघ, सरचिटणीस ऋषिकेश कापडे, कार्याध्यक्ष प्रशांत महाले, राज्य उपाध्यक्ष रवींद्र बोरसे, विभागीय अध्यक्ष रवींद्र सैंदाने, सचिव रवींद्र देवरे, महिला राज्य कोषाध्यक्षा रुखमा पाटील, महिला अध्यक्ष सुरेखा बोरसे आणि सरचिटणीस प्रतिभा वाघ यांनी दिली.
Leave a Reply