क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जळगावात जनजातीय गौरव दिवस साजरा करण्यात येणार आहे. राज्याच्या आदिवासी विकास विभागांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे हा सोहळा होणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोहळा
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव पाटील राहणार आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील खासदार, विधानसभा व विधानपरिषद सदस्य तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, शैक्षणिक प्रगती तसेच आदिवासी बांधवांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
प्रभातफेरीने होणार सुरुवात
सोहळ्याची सुरुवात सकाळी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण (जी. एस. ग्राऊंड), जळगाव येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात येणाऱ्या भव्य प्रभातफेरीने होणार आहे. या प्रभातफेरीतून बिरसा मुंडा यांच्या कार्याचा जनजागृतीपर संदेश दिला जाणार आहे. आदिवासी बांधव, भगिनी, विद्यार्थी, युवक-युवती तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले आहे.
Leave a Reply