आजच्या धावपळीच्या काळात माणसांमधील आपुलकी आणि सहानुभूती कमी होत चालली आहे. मोबाईल आणि समाजमाध्यमांमुळे आपण एकमेकांशी जोडले गेलो असलो, तरी प्रत्यक्ष आयुष्यातील भावनिक जवळीक कुठेतरी हरवत चालली आहे. अशा काळात समाजात माणुसकी, करुणा आणि परस्पर आदर जिवंत ठेवण्यासाठी दरवर्षी १३ नोव्हेंबर हा दिवस जगभरात जागतिक दयाळूपणा दिवस म्हणून साजरा केला जातो.
जपानमधून सुरू झालेला प्रवास
या दिवसाची मुळे जपानमध्ये आहेत. १९९७ मध्ये टोकियो येथे जगभरातील सामाजिक संस्था आणि दयाळूपणाचा प्रसार करणाऱ्या संघटनांची एक परिषद भरली होती. समाजातील तणाव आणि दुरावा कमी करून सकारात्मकता कशी पसरवता येईल, यावर त्या परिषदेत चर्चा झाली. याच विचारातून वर्ल्ड काइंडनेस मूव्हमेंट या जागतिक चळवळीची स्थापना झाली. त्यानंतर १९९८ मध्ये या चळवळीने १३ नोव्हेंबर हा दिवस अधिकृतपणे जागतिक दयाळूपणा दिवस म्हणून घोषित केला. टोकियो परिषदेच्या पहिल्या दिवसाची आठवण म्हणून ही तारीख निवडण्यात आली. सुरुवातीला काही देशांपुरता मर्यादित असलेला हा उपक्रम आज भारत, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, इटली, सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या अनेक देशांमध्ये साजरा केला जातो.
छोट्या कृतींतून मोठा बदल
दयाळूपणा म्हणजे केवळ मोठी आर्थिक मदत किंवा महागड्या भेटवस्तू नव्हेत. थकलेल्या प्रवाशाला बसमध्ये बसायला जागा देणे, रस्ता ओलांडणाऱ्या वृद्ध व्यक्तीचा हात धरणे, तहानलेल्या पक्ष्यांसाठी पाणी ठेवणे किंवा सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानणे, हीही दयाळूपणाचीच उत्तम उदाहरणे आहेत. या दिवशी शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्था आणि कार्यालयांमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. अनेक ठिकाणी काइंडनेस कार्ड्स वाटली जातात, तर काही देशांमध्ये पिवळी फुले देऊन सद्भावना व्यक्त केली जाते.
मन आणि शरीरावर सकारात्मक परिणाम
दुसऱ्यांना मदत करताना मेंदूमध्ये ऑक्सिटोसिन, सेरोटोनिन आणि डोपामिन यांसारखी आनंददायी संप्रेरके स्रवतात, असे संशोधनातून समोर आले आहे. यामुळे भीती, नैराश्य आणि मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. नियमित सहानुभूती बाळगणाऱ्या लोकांचा रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदय निरोगी राहते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. मानसशास्त्रात याला हेल्पर्स हाय असेही म्हणतात. डिजिटल काळात इंटरनेटवर कोणाबद्दलही वाईट टिप्पणी न करणे आणि चांगल्या कामाचे कौतुक करणे, हाही दयाळूपणाचाच एक भाग आहे. स्वतःप्रती दयाळू राहणे आणि स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घेणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply