राज्यात राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा जोर धरत असताना आता दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची चर्चाही सुरू झाली आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या एका वक्तव्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली असून शिवसेनेतील नेते त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.
ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?
काही दिवसांपूर्वी दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास आनंद होईल, असे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास मलाच सर्वाधिक आनंद होईल, असे म्हटले आहे. धाराशिवचे खासदार असलेले निंबाळकर नुकतेच शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यांच्या या विधानामुळे ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या संभाव्य एकत्रीकरणाच्या चर्चेला पुन्हा राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, प्रत्यक्षात काही राजकीय हालचाली होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
गोगावले आणि गुलाबराव पाटील यांची भूमिका
मंत्री भरत गोगावले यांनीही दोन शिवसेना एकत्र येण्याबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले. आत्ताचे भवितव्य आणि भविष्य पाहता तसे काही वाटत नाही, मात्र राजकारणात कधीही काही घडू शकते, असे गोगावले म्हणाले. सकाळचा संध्याकाळी आणि संध्याकाळचा सकाळी कुठे, त्यामुळे राजकारणात काय घडेल सांगू शकत नाही, असेही त्यांनी नमूद केले. गुलाबरावांना तशी भनक लागली असेल, तर येत्या मंगळवारी कॅबिनेट बैठकीत त्यांना याबाबत विचारणार असल्याचेही गोगावले यांनी सांगितले.
दोन्ही शिवसेना एकत्रीकरणावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी रेल्वेचे उदाहरण दिले होते. याबाबत मी काही सांगू शकत नाही. शेवटी मी आगगाडीचा डब्बा आहे. एकनाथ शिंदे आमचे इंजिन आहेत आणि इंजिन जिथे असते तिथे डब्बा असतो. त्यामुळे जिकडे आमचे इंजिन जाईल, तिकडे डब्बा जाईल, असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदे जे ठरवतील तेच होईल, असे म्हटले होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply