मुंबईच्या कोस्टल रोडवर काल रात्री विचित्र अपघात घडला. रात्री तीनच्या सुमारास नरीमन पॉईंटकडून वरळीकडे जाणाऱ्या मार्गावर आधी दोन गाड्यांचा अपघात झाला होता. त्यामुळे काही गाड्या रस्त्यावर थांबल्या होत्या. त्याच वेळी मागून अनियंत्रित वेगाने आलेल्या एका महिंद्रा एसयूव्हीने थांबलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेत एकूण पाच ते सहा गाड्या एकमेकांना आदळल्या.
एसयूव्हीला आग; अग्निशमन दल घटनास्थळी
धडकेनंतर महिंद्रा एसयूव्हीला आग लागली, त्यामुळे घटनास्थळी धावपळ उडाली. माहिती मिळताच अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाने आग विझवली. सुदैवाने या अपघातात कुणाचाही जीव गेला नाही, मात्र काही जण किरकोळ जखमी झाले.
दीड तास वाहतूक ठप्प; चौकशी सुरू
अपघातामुळे कोस्टल रोडवरील वाहतूक जवळपास दीड तास बंद ठेवावी लागली. नंतर वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली. मागून धडक देणाऱ्या एसयूव्हीचा चालक नशेत होता का, याची चौकशी सुरू आहे. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई स्थानिक पोलीस करत आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply