इगतपुरी तालुक्यातील टाकेद गावातील कातकरी वस्तीत राहणाऱ्या नागरिकांना स्वातंत्र्यानंतर प्रथमच जात प्रमाणपत्र मिळाले आहे. गावातील एकशे अकरा नागरिकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले असून, या घटनेमुळे कातकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अनेक वर्षांपासून जात प्रमाणपत्राअभावी या समाजातील नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यात अडचणी येत होत्या. शिक्षण आणि सामाजिक प्रगतीसाठीही प्रमाणपत्राची गरज भासत होती. ही अडचण लक्षात घेऊन राम शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. आवश्यक कागदपत्रे आणि पंचनामे सादर केल्यानंतर महसूल प्रशासनाने या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद दिला आणि अखेर कातकरी बांधवांचे प्रमाणपत्र मिळण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
वाटपावेळी मान्यवरांची उपस्थिती
प्रांताधिकारी पवन दत्ता, तहसीलदार अभिजित बारावकर आणि नायब तहसीलदार धनंजय लचके यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी आबाजी बारे, अशोक महाले, राम शिंदे आणि मंडळ अधिकारी महेश वाघ यांचा टाकेद ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या कामात तलाठी निकित तरटे, गणेश वाजे, माजी सरपंच बाळासाहेब घोरपडे, पोलिस पाटील प्रभाकर गायकवाड, अशोक महाले, दिलीप बांबळे आणि रामनाथ जाधव यांनी सहकार्य केले.
ग्रामस्थांनी मानले आभार
जात प्रमाणपत्र मिळाल्यामुळे आता घरात वीज मीटर, रेशनकार्ड, रस्ता, वीज आणि पाणी यांसह घरकुलासारख्या सर्व सुविधांचा लाभ मिळेल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. सर्व अधिकाऱ्यांचे आम्ही ऋणी आहोत, असे दिलीप बांबळे आणि पार्वतीबाई पवार यांनी सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply