दीर्घकाळ परकी सत्तेखाली राहिल्याने आपली अस्मिता नष्ट झाली. भूतकाळामध्ये गाडली गेलेली ही अस्मिता आपण जिवंत केली नाही, तर भविष्य अंधकारमय होईल. मात्र, आपण ज्ञानपरंपरेत जे सांगितले त्याच्या पुढे गेलो, तर भविष्य उज्ज्वल असेल. धर्मशास्त्रातील कर्तव्य व इतर गोष्टी आजही लागू पडतात. भूतकाळाचा विसर पडू न देणे ही आपली जबाबदारी आहे, असे मत पुण्यात झालेल्या ‘समृद्ध इतिहासाकडून उज्ज्वल भविष्याकडे’ या परिसंवादात अभ्यासकांनी मांडले.
या परिसंवादात डॉ. सरोजा भाटे, डॉ. निर्मला कुलकर्णी आणि डॉ. अनघा जोशी या विदुषींनी सहभाग घेतला. प्रणव गोखले यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
भारतीय ज्ञानपरंपरेचे वैभव
व्यापकता आणि सर्वसमावेशकता ही भारतीय ज्ञानपरंपरेची वैशिष्ट्ये आहेत. जगभरातील गणिताचे मूळ भारतामध्ये आहे. दशमान पद्धती आणि शून्याची संकल्पना ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. ऑनलाइन बँकिंगसारख्या आधुनिक प्रणालीत वापरली जाणारी ‘रिपिटेड स्क्वेअरिंग मेथड’ भास्कराचार्यांनी दीड हजार वर्षांपूर्वी शोधून काढली होती. पाणिनी हा अल्गोरिदमचा पहिला संशोधक मानला जातो; त्याने इ.स.पूर्व पाचव्या शतकात कृत्रिम भाषेचा शोध लावला होता.
पुरातत्त्व आणि धर्मशास्त्र
वेद आणि पुरातत्त्वविद्या परस्परांना पूरक आहेत. भारतीय ज्ञानपरंपरा आणि पुरातत्त्वविद्या इ.स.पू. अडीच ते तीन हजार वर्षांपूर्वीची आहे. लोथल हे जगातील सर्वांत प्राचीन बंदर भारतात असल्याचे परदेशी अभ्यासकांकडूनही मान्य करण्यात आले आहे. मुंबईजवळील घारापुरी येथे अनेक देशांशी संबंध असलेले बंदर सापडले आहे. वेदांची मौखिक परंपरा हे जगातील एक आश्चर्य असून ही परंपरा फक्त भारतात आहे, असे मत मांडण्यात आले.
‘कौटिल्याचे अर्थशास्त्र’ हा उत्तम सुशासनाचा पाया समजला जातो. यात राजाने स्वतःचा विचार न करता प्रजेचा विचार करावा, देशांनी परस्परांशी संबंध कसे ठेवावेत याचे मार्गदर्शन करण्यात आले आहे. धर्मशास्त्रात प्रत्येकाची कर्तव्ये सांगितली असून त्यातील आचार आणि व्यवहार आजही उपयुक्त समजले जातात. धर्मशास्त्रात भागीदारीच्या व्यवसायाचा उल्लेख आणि नियम असून आधुनिक भागीदारी कायद्यात त्याचे प्रतिबिंब दिसते, असेही परिसंवादात नमूद करण्यात आले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply