सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात बिरोबा मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीवरून दोन गटांत जोरदार वाद झाला. आडेगाव येथील बिरोबा मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या हाके यांना मराठा समर्थकांनी त्यांच्या उपस्थितीवर आक्षेप घेत जाब विचारला. सुरुवातीला दोन्ही गटांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि त्यानंतर परिस्थिती चिघळून धक्काबुक्की आणि हाणामारी झाली. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
लक्ष्मण हाके यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. मोहोळ तालुक्यातील पोखरापूर येथील बिरोबा यात्रेत सहभागी झाल्यानंतर ते जवळच असलेल्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते, असे त्यांनी सांगितले. मंदिरातील पुजाऱ्यांच्या आग्रहाखातर त्यांचा सत्कार सुरू असताना माईकवर बोलणाऱ्या व्यक्ती आणि समोर बसलेल्या काही लोकांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर काही जण अचानक त्यांच्या कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून आले आणि ‘तुम्ही इथे कशाला आलात’ असा सवाल करत त्यांनी गोंधळ घातला, असे हाके यांनी सांगितले.
पोलीस बंदोबस्त असतानाही राडा
या वादाचे रूपांतर पुढे धक्काबुक्की आणि हाणामारीत झाले. समोरच्या गटातील लोकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर हाके यांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने दोन्ही बाजूंच्या लोकांमध्ये झटापट झाली. आमच्यासोबत पोलीस बंदोबस्त असतानाही मंदिराच्या गाभाऱ्यात अशा प्रकारे अंगावर धावून येणे धक्कादायक आहे, असे हाके म्हणाले. देवदर्शनासाठी गेल्यानंतर मंदिरात अशा प्रकारची घटना घडणे अत्यंत चुकीचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
हाके यांचा इशारा
काही लोक केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी पुढे आले होते आणि स्वतःला मोठे दाखवण्यासाठी हा प्रकार करण्यात आला, असा आरोपही हाके यांनी केला. राज्यातील सामाजिक वातावरण हळूहळू सुरळीत होत असताना काही विघ्नसंतोषी लोकांनी जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असे ते म्हणाले. मंदिरात त्यांचा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता किंवा भाषणही होणार नव्हते; ते केवळ दर्शनासाठी गेले होते, असे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेचा तीव्र निषेध करत धमक्या आणि दबावाला घाबरणार नसून शोषित, वंचित, आदिवासी आणि ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठीचा लढा अधिक तीव्र केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply