मुंबईत भरदिवसा गोळीबाराची घटना घडली आहे. कुर्ल्यातील हलाव पुलाजवळ एका तरुणावर गोळ्या झाडण्यात आल्या. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी तरुणावर तीन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दोन गटांमधील वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरू केला आहे.
घटना कशी घडली?
व्ही. बी. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही गोळीबाराची घटना घडली. मकडवाला कंपाउंड येथील हलाव पुलाजवळ आज दुपारी सुमारे १२:४० वाजताच्या सुमारास तरुणावर गोळ्या झाडण्यात आल्या. पूर्ववैमनस्यातून विनोद मल्लाप्पा पवार (वय ४० वर्षे) यांच्यावर हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने कुर्ला परिसर हादरून गेला असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
पोलिसांचा तपास सुरू
विनोद पवार यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या असून ते गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या विनोद यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच व्ही. बी. नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि इतर पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. पोलीस सध्या हल्लेखोरांचा शोध घेत असून परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply