ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोनिया गांधी यांच्यावर टीका केली आहे. सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रातील मजकुरावर अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, २०१४ साली काँग्रेसचं सरकार गेलं ते त्यांच्या कर्तृत्वाने गेलं. माझा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मी जे काही करतो ते देशहितासाठी आणि समाजाच्या हितासाठी करतो, असेही अण्णा हजारे म्हणाले.
पुस्तकातील मजकुरावर अण्णांची प्रतिक्रिया
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी लिहिलेल्या Belonging: A Journey of Love या त्यांच्या आत्मचरित्रामध्ये अण्णा हजारे यांचाही उल्लेख केलेला आहे. या पुस्तकामध्ये अण्णा हजारे यांनी दिल्लीत केलेल्या आंदोलनाला आरएसएस आणि भाजपचा छुपा पाठिंबा होता, असा आरोप करण्यात आला आहे. अण्णा पुढे कुठेच दिसले नाहीत, असेही पुस्तकात म्हटले आहे. सोबतच अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे आमचं सरकार गेलं, असेही सोनिया गांधी यांनी या पुस्तकात म्हटले आहे. याच मजकुरावर अण्णा हजारे यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी वरील स्पष्टीकरण दिले.
आणीबाणीवरही पुस्तकात दावे
पुढे बोलताना अण्णा हजारे यांनी जबाबदार व्यक्तीने जबाबदारीनेच बोलले पाहिजे, अन्यथा स्वतःची किंमत कमी होते, असा टोलाही सोनिया गांधी यांना लगावला आहे. सोनिया गांधी यांचे Belonging: A Journey of Love हे पुस्तक देशभरात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. सोनिया गांधींनी या पुस्तकात आणीबाणीवरही अनेक दावे केले आहेत. आणीबाणी लावण्यावरून इंदिरा गांधींवर नेहमीच टीका होते. मात्र या पुस्तकातून त्यांनी इंदिरा गांधींची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला आहे. आणीबाणी लागू करण्याचा इंदिरा गांधींचा विचार नव्हता, असा दावा सोनिया गांधींनी या पुस्तकातून केला आहे. आणीबाणी लागू करण्याबाबत त्यांच्या मनात संभ्रम होता. राजीव गांधीही आणीबाणीच्या विरोधात होते. मात्र संजय गांधी हे आणीबाणी लावण्याच्या समर्थनात होते, असे त्यांनी म्हटले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply