राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि सोलापूरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. रोहित पवार यांनी केलेल्या टीकेला जयकुमार गोरे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत थेट इशारा दिला आहे.
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे बालाजी सरोवर येथे बैठका घेत असल्याचा मुद्दा रोहित पवार यांनी उपस्थित केला होता. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ बैठका घेऊन ते काम करत आहेत, असा उल्लेख करत त्यांनी गोरेंवर टोला लगावला. कष्ट जास्त झाले की माणूस गोळ्या खातो, असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले होते. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.
गोरेंचे जोरदार प्रत्युत्तर
रोहित पवारांच्या टीकेनंतर जयकुमार गोरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. माझ्या राजकीय जीवनातील संघर्ष मोठा आहे. मी शरद पवारांचा नातू नाही किंवा कोणत्या उद्योगपतीचा मुलगा नाही. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नाही, असे गोरे म्हणाले.
आजोबा आणि चुलत्यांचे नाव घेऊन राजकारण करत नाही. एक-दोनदा नव्हे, तर चार वेळा निवडून आलो आहे, असा उल्लेखही त्यांनी केला. माझ्याकडून काही चूक होत असेल तर माझ्यावर जरूर टीका करा. मात्र टीका करताना पातळी सोडली, तर मलाही त्याच पातळीवर जाऊन उत्तर देता येते, असे गोरे म्हणाले.
‘माझा इतिहास तुमच्या फॅमिलीला माहिती आहे’
पुढे बोलताना गोरे म्हणाले की, माझं तोंड उघडायला भाग पाडू नका, कारण माझा इतिहास तुमच्या फॅमिलीला माहिती आहे. अशा शब्दांत त्यांनी रोहित पवारांना इशारा दिला.
या वक्तव्यांमुळे रोहित पवार आणि जयकुमार गोरे यांच्यातील राजकीय वाद आता अधिक चर्चेत आला आहे. सोलापूरच्या पालकमंत्र्यांच्या कामकाजावरून सुरू झालेली टीका आता दोन्ही नेत्यांच्या राजकीय पार्श्वभूमीपर्यंत पोहोचली आहे. आता रोहित पवार या इशाऱ्याला काय उत्तर देतात आणि हा वाद पुढे कोणते वळण घेतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply