दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले. तिथे त्यांनी शेतकरी अंबादास तांगडे यांच्या घरी भेट दिली आणि कुटुंबासोबत जेवण केले. संकट मोठे असले तरी धीर सोडू नका आणि टोकाचा निर्णय घेऊ नका, असे आवाहन त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.
या भेटीवेळी मंत्री संजय शिरसाट, मंत्री उदय सामंत, खासदार संदीपान भुमरे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, मराठवाडा युवासेनेचे सचिव अभिमन्यू खोतकर, नगरसेविका दर्शना झोल-खोतकर आणि माजी खासदार आनंद परांजपे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. मंत्रिपदाचा शिष्टाचार बाजूला ठेवत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तांगडे यांच्या झोपडीत कुटुंबासोबत जमिनीवर बसून जेवण केले. त्यांनी तांगडे यांच्या मातोश्री आणि मुलांची विचारपूस केली.
दुष्काळग्रस्तांना मदतीची घोषणा
दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षाच्या सर्व मंत्र्यांना दिले होते. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून मंत्र्यांनी दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील शेतकरी कुटुंबांना भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला होता.
राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी बारा कलमी सवलती जाहीर केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रीम मदत म्हणून पाच हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. पक्षाकडूनही शेतकऱ्यांना दिवाळी शिधा वाटण्यात आला. तांगडे कुटुंबाच्या मुलीच्या उच्च शिक्षणाची आणि विवाहाची जबाबदारी पक्षाने घेतली असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
मुलींच्या विवाहासाठी सामूहिक सोहळा
दुष्काळग्रस्त भागात ज्या शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह ठरले आहेत, त्यांचे विवाह पक्ष सामूहिक विवाह सोहळ्यातून करेल, असेही शिंदे म्हणाले. शेतकऱ्यांच्या पत्नींना पंचवीस हजार शिलाई मशीन आणि मुलींना पंचवीस हजार सायकल पक्षाने वाटल्या आहेत. जिथे संकट तिथे पक्ष उभा राहतो, हे समीकरण तयार झाले आहे, असे त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांनी धीर सोडू नये, सरकार पाठीशी आहे. पुढचा पाऊस होईपर्यंत पिण्याचे पाणी, जनावरांना चारा आणि अन्नधान्याचे नियोजन करण्यात सरकारसोबतच पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरेल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply