पाडवा हा दिवाळीतील असा सण आहे, जो पती-पत्नीच्या नात्यातील प्रेम आणि जिव्हाळा अधिक घट्ट करतो. या दिवशी पत्नी पतीला ओवाळते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तर पतीही भेटवस्तू देऊन आपले प्रेम व्यक्त करतो. त्यामुळे पाडव्याचा दिवस आणखी खास करण्यासाठी एकमेकांसाठी आवडीचे गोडधोड बनवण्याची ही चांगली संधी असते. यंदाच्या पाडव्याला नवऱ्यासाठी काहीतरी वेगळे बनवायचे असेल, तर केशर-बदाम खीर हा छान पर्याय ठरू शकतो.
केशराचा मंद सुगंध, बदामाचा कुरकुरीतपणा आणि दुधाचा गोडवा यामुळे ही खीर अगदी शाही लागते. विशेष म्हणजे ती बनवायला फारशी मेहनतही लागत नाही. घरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्यातून ही खीर तयार करता येते.
खीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि पद्धत
दूध, तांदूळ, साखर, केशर, बदाम आणि वेलची पावडर एवढेच साहित्य या खिरीसाठी लागते. सगळ्यात आधी तांदूळ भिजवून घ्यावा. तांदूळ किमान एक तास भिजत ठेवल्यास खीर लवकर तयार होते. त्यानंतर एका भांड्यात दूध गरम करावे आणि ते मंद आचेवर उकळू द्यावे. एका वाटीत थोडे कोमट दूध घेऊन त्यात केशर कुस्करावे. दुधाला उकळी आल्यावर त्यात हे केशर घालावे. काही वेळाने दुधात केशराचा छान रंग आला की त्यात भिजवलेले तांदूळ घालावेत आणि चांगले शिजू द्यावेत.
खीर शिजत असताना दुसरीकडे बदाम भाजून घ्यावेत. काही बदाम बारीक वाटावेत, तर बाकीचे बारीक चिरावेत. खीर शिजल्यावर त्यात साखर घालावी. साखर घातल्यावर खिरीत थोडे पाणी दिसू लागले, तर ती पुन्हा चांगली उकळावी. खीर घट्ट झाल्यावर त्यात बदामाची पूड घालून मिसळावी. शेवटी गॅस बंद करून बारीक चिरलेल्या बदामांनी खीर सजवावी. केशर-बदाम खीर तयार!
या टिप्स लक्षात ठेवा
केशर आधी कोमट दुधात भिजवून ठेवल्यास खिरीला छान रंग आणि सुगंध येतो. खीर घट्ट आणि मलईदार होण्यासाठी फुल क्रीम दुधाचा वापर करावा. दूध भांड्याला लागू नये म्हणून खीर अधूनमधून ढवळत राहावी. शिजताना शेवटी वेलची पूड घातल्यास स्वाद वाढतो. सर्व्ह करताना बदाम, पिस्ता आणि केशराच्या काड्यांनी सजवता येते. ही खीर गरम किंवा थंड दोन्ही प्रकारे सर्व्ह करता येते; थंड खीर हवी असल्यास ती फ्रिजमध्ये ठेवावी.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply