कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात प्रतिष्ठेची मानली जाणारी गोकुळ दूध संघाची अध्यक्षपदाची निवडणूक अखेर पार पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तासंघर्षाला आता पूर्णविराम मिळाला असून, या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. राजेश पाटील यांनी सतेज पाटील यांच्या आघाडीचे उमेदवार शशिकांत पाटील-चुयेकर यांचा पराभव केला. मतदानात १६ विरुद्ध १३ असा निकाल लागला. निवडीनंतर राजेश पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया देत पुढील कामकाजाची दिशा स्पष्ट केली आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष काय म्हणाले?
अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर राजेश पाटील यांनी सर्वप्रथम दूध उत्पादक शेतकरी आणि मतदारांचे आभार मानले. गोकुळच्या कारभारात सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा आपला प्रयत्न असेल, असे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, त्यांच्यावर दूध संघाची जबाबदारी सोपवली आहे आणि ते सर्वांच्या हिताचे काम करतील. गोकुळचे वैभव वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असून गेल्या वर्षभरात झालेला तोटा भरून काढण्यासाठी योग्य नियोजन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विरोधकांनाही सोबत घेण्याची तयारी
निवडणुकीच्या काळात राजकीय संघर्ष झाला असला, तरी आता तो बाजूला ठेवण्याची भूमिका राजेश पाटील यांनी मांडली. कोर्टाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर निवड प्रक्रिया पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणुकीत विरोधात असलेल्या संचालकांनीही आता दूध उत्पादकांच्या हितासाठी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले. झालं गेलं विसरून जाऊया, पुढील पाच वर्षे बाकीचे राजकारण बाजूला ठेवून एकदिलाने काम करूया आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी सर्वांनी हातात हात घालून काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या निवडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तब्बल ६३ वर्षांनंतर चंदगडसारख्या भागाला गोकुळच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे. त्यामुळे या निवडीकडे केवळ राजकीय विजय म्हणून नव्हे, तर चंदगडच्या दृष्टीनेही महत्त्वाची घडामोड म्हणून पाहिले जात आहे. एकीकडे महायुतीने गोकुळच्या सत्तासंघर्षात बाजी मारली, तर दुसरीकडे नव्या अध्यक्षांसमोर संघाचा तोटा भरून काढण्याचे आणि दूध उत्पादकांचा विश्वास जपण्याचे मोठे आव्हान असणार आहे. आता राजेश पाटील हे आपल्या घोषणांची अंमलबजावणी कशी करतात, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply