अजित पवार यांच्या अपघाताच्या तपासावरून रोहित पवार यांनी पुन्हा एकदा संशय व्यक्त केला आहे. तपास अपेक्षित गतीने पुढे जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. ज्या पद्धतीने तपास व्हायला हवा होता, तसा तो होताना दिसत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रातील ९० टक्क्यांहून अधिक लोकांना हा अपघात नसून घातपात असावा, असे वाटते, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. या प्रकरणात साधी एफआयआरही दाखल होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
१५ नोव्हेंबरला सादरीकरण करणार
रोहित पवार यांनी सांगितले की, १५ नोव्हेंबरला या प्रकरणासंदर्भात महत्त्वाचे सादरीकरण करणार आहेत. या सादरीकरणातून काही महत्त्वाच्या बाबी समोर आणणार आहोत. त्यातून अजित पवार यांना न्याय मिळवून देण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. दिवाळीनंतर शेवटचे सादरीकरण घेईन, असेही त्यांनी सांगितले. रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांबाबत विचारले असता, ते आरोप आपण ऐकले नसल्याचे रोहित पवार म्हणाले. मात्र सुनील तटकरे यांचे नाव या प्रकरणाशी जोडण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. सत्ताधाऱ्यांकडे या प्रकरणाबाबत काही वेगळी माहिती असेल, तर त्यांनी केवळ नावे घेण्याऐवजी पुरावे समोर आणावेत, असे आवाहन त्यांनी केले.
गोकुळच्या सत्तासंघर्षावरही भाष्य
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, अर्थात गोकुळमधील सत्तासंघर्षावरही रोहित पवार यांनी भाष्य केले. सतेज पाटील यांच्या पॅनेलचे बहुतांश उमेदवार निवडून आले असतानाही भाजप आणि मित्रपक्षांकडून रडीचा डाव खेळला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. गोकुळमध्ये बंटी पाटील यांच्या पॅनेलला लोकांनी कौल दिला, असे ते म्हणाले. आजच्या भाषणांमध्ये सर्वांनी हसन मुश्रीफ यांना लक्ष्य केले. मात्र या सगळ्यामागचे मुख्य सूत्रधार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्याशिवाय चार जणांना मतदानाचा अधिकार देणे शक्य नसल्याचा दावाही त्यांनी केला. गोकुळमधील संघर्ष हा केवळ स्थानिक राजकारणापुरता मर्यादित नसून महाराष्ट्रातील संविधान वाचवण्याचा लढा असल्याचेही त्यांनी म्हटले. शरद पवार यांच्या भेटीवरून विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा उधाण आले असताना रोहित पवार यांनी अशा कोणत्याही चर्चेचा विरोध केला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply