शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार यांच्या घातपातामध्ये तटकरे यांचा हात आहे का, याची चौकशी झाली पाहिजे, असे कदम यांनी म्हटले आहे. या आरोपांनंतर तटकरे यांनीही आक्रमक भूमिका घेतली असून आरोपांबाबत कदम यांना कायदेशीर नोटीस पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
कदम आणि तटकरे यांच्या या वादावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया आता समोर आली आहे. या प्रतिक्रियेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला आहे.
## ‘गृहमंत्र्यांनी यावर बोलायला पाहिजे’
मी कोणाचेही नाव घेणार नाही, ते घेणे योग्य नाही, असे सांगत राऊत म्हणाले की, कदम हे सरकारमध्ये आहेत, तटकरे हेही सरकारमध्ये आहेत. दोन्ही पक्षांचे लोक सरकारमध्ये आहेत. ज्या गृहमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ते काम करत आहेत, त्या गृहमंत्र्यांनी यावर बोलायला पाहिजे, पण त्यांना अधिकार नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.
दिवाळीवर सरकारकडून काही अंशी निर्बंध घालण्यात आल्याच्या मुद्द्यावरही राऊत यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. सरकार निर्बंध घालत असते, सरकारला दुसरे काम काय आहे? न्यायालयाला दुसरे काय काम आहे? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. ब्रिटिशांच्या काळातही हिंदू सण आणि उत्सवांवर एवढे निर्बंध नव्हते, असे ते म्हणाले.
सरकार कोणत्याच वादाचे नसते, ते फक्त मतांचे असते आणि मतांसाठी ते कोणतेही काम करू शकते, असे राऊत म्हणाले. दिवाळीवर निर्बंध नसावेत, लोकांना फटाके वाजवायचे असतील तर त्यांना वाजवू द्या, दोन दिवस वाजवतील, असे त्यांनी सांगितले. हवेचा थर खालावतो असे म्हटले जाते, मग इतर वेळी तो वर जातो का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दिवाळीच्या निमित्ताने भांडुप येथील भांडुपेश्वर कुंड परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आले असताना संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply