कोल्हापूरच्या गोकुळ दूध महासंघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राज्यातील राजकारण तापले आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरस सुरू आहे. सोमवारी काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी कोल्हापुरात मोर्चा काढून शक्तिप्रदर्शन केले. त्यानंतर सायंकाळी महायुतीने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
महायुतीकडून अध्यक्षपदासाठी अजित नरके यांच्या नावाची चर्चा असल्याचे सांगण्यात येत आहे. अजित नरके हे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू आहेत. अध्यक्षपदाची माळ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गळ्यात पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
धनंजय महाडिक यांनी काय आरोप केले?
पत्रकार परिषदेत धनंजय महाडिक यांनी सांगितले की, आमच्यापेक्षा त्यांचा केवळ एकच सदस्य जास्त निवडून आला आहे. मात्र त्यांनी साडेपाच लाख लोकांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. आम्ही रस्त्यावर आणि न्यायालयात लढाई लढू, असे ते म्हणाले. तीन सभा तहकूब झाल्या असत्या तर प्रशासक आले असते आणि हे काम सहज झाले असते. संचालक नेमल्यामुळे आता २५ जणांमधूनच अध्यक्ष निवडला जाणार आहे. महाविकास आघाडीतील लोकांनी केवळ खोटे कथन पसरवण्याचे काम केले, असा आरोपही त्यांनी केला.
सहकारातील नियमांवरून वाद
सहकारात कोरम अभावी सभा होऊ शकते का, हे सर्वांना माहिती आहे. कोणतीही संस्था तिच्या नियमावलीच्या आधारे चालते. मात्र शासन ती रद्द करू शकते, असे खोटे कथन सतेज पाटील यांनी पसरवले, असे महाडिक म्हणाले. आजच्या मोर्च्यात बाहेरचेच लोक जास्त होते, असा आरोपही त्यांनी केला. निवडणूक प्रक्रियेत निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी मुख्यमंत्री आणि सरकारने हस्तक्षेप केला, असेही ते म्हणाले. सरकारला संघ ताब्यात ठेवायचा असता तर त्यावर प्रशासक नेमला असता. पण सरकारने निवडणूक लावली होती, असे त्यांनी सांगितले. न्यायालयाच्या निकालामुळे गोकुळ दूध संघाचा डी. वाय. पाटील संघ झाला नाही, असेही महाडिक यावेळी म्हणाले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply