दिवाळी म्हणजे दिव्यांची रोषणाई, फराळाचा गोडवा, नात्यांमधील स्नेह आणि आनंदाची उधळण. पण या सणाचा खरा आनंद केवळ आपल्या घरापुरता मर्यादित न ठेवता तो गरजूंच्या आयुष्यातही पोहोचवण्याचा प्रयत्न जळगावकरांकडून होत आहे. शहरात एकीकडे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मैफली रंगत आहेत, तर दुसरीकडे वंचित मुले, आदिवासी बांधव, शेतकरी आणि गरीब कुटुंबांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी विविध सामाजिक संस्था, सेवाभावी संघटना आणि लोकप्रतिनिधी पुढाकार घेत आहेत.
दिवाळीच्या निमित्ताने जळगाव शहरात सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांची परंपरा कायम आहे. विशेषतः दिवाळी पाडव्याच्या पहाटे होणाऱ्या सांगीतिक कार्यक्रमांना रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. चांदोरकर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दरवर्षी महात्मा उद्यानात पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच संस्कार भारतीतर्फे महापालिकेच्या आवारात भक्तिगीतांची मैफल रंगणार आहे. शहरातील विविध भागांत तसेच ज्येष्ठ नागरिक संघातही पाडवा पहाटेच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
वंचितांचा आनंदोत्सव
दिवाळीचा आनंद समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने अनेक संस्था सामाजिक उपक्रम राबवत आहेत. दीपस्तंभ फाउंडेशनतर्फे दीपोत्सव पूजनाचा कार्यक्रम घेतला जातो. नोबेल फाउंडेशनचे कार्यकर्ते ग्रामीण भागातील खेड्या-पाड्यांवर जाऊन गरजू मुलांसोबत दिवाळी साजरी करतात. तर भरारी फाउंडेशनतर्फे शेतकऱ्यांना दिवाळी फराळासह बियाण्यांचे वाटप केले जाते. लोकप्रतिनिधींकडूनही सामाजिक बांधिलकी जपली जाते. आमदार सुरेश भोळे शहरातील भिल्ल वस्ती आणि गरीब वस्त्यांमध्ये जाऊन नागरिकांसोबत दिवाळी साजरी करतात. मंत्री गिरीश महाजन हे आदिवासी पाड्यांवर जाऊन आदिवासी बांधवांसोबत सणाचा आनंद वाटून घेतात.
सामाजिक संस्थांचाही पुढाकार
रोटरी क्लब तसेच शहरातील अन्य सामाजिक आणि सेवाभावी क्लबचे सदस्यही दिवाळीनिमित्त विविध उपक्रम राबवत आहेत. गरजू कुटुंबांना फराळ, मिठाई आणि आवश्यक वस्तूंचे वाटप, मुलांसोबत आनंदाचे क्षण, तसेच समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचे काम केले जाते. विविध सामाजिक संस्था आणि मित्रमंडळांकडूनही अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्यामुळे यंदाच्या दीपोत्सवात रोषणाईसोबतच माणुसकीचा प्रकाशही उजळणार आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply