विरारजवळील नालासोपाऱ्यात दिवाळी पहाटेचा सुरेल कार्यक्रम उत्साहात पार पडला. अमर संगीत कला मंडळ आणि वसई-विरार महापालिकेच्या वाचनालय विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रौप्यमहोत्सवी दिवाळी पहाट कार्यक्रम सामवेदी ब्राह्मण संघाच्या पटांगणात झाला. गेली २५ वर्षे अविरतपणे सुरू असलेल्या या उपक्रमाने यंदाही पहाटेच्या प्रसन्न वातावरणात संगीतप्रेमींना सुरेल मेजवानी दिली.
नाट्यसंगीत, अभंग, भावगीते आणि शास्त्रीय संगीताच्या सादरीकरणाने उपस्थित रसिक भारावून गेले. सुप्रसिद्ध गायक अभिषेक काळे आणि गायिका नीलाक्षी पेंढारकर यांनी आपल्या सुरेल गायनातून विविध संगीतप्रकारांची बहारदार अनुभूती दिली. त्यांना सुशील गद्रे यांनी ऑर्गनवर, रूपक वझे यांनी तबल्यावर, सर्वेश तांडेल यांनी पखवाजवर, पुरुषोत्तम वाघ यांनी व्हायोलिनवर आणि दीपक पाटील यांनी तालवाद्यावर उत्कृष्ट साथसंगत केली. चिन्मय पाटील यांच्या प्रभावी निवेदनाने कार्यक्रमात रंगत आली, तर नरेश पाटील यांनी ध्वनी संयोजनाची जबाबदारी सांभाळली.
मान्यवरांची उपस्थिती
या वेळी आमदार राजन नाईक, उपमहापौर मार्शल लोपीस, विरोधी पक्षनेते मनोज पाटील, आरोग्य सभापती नीलेश देशमुख, सामवेदी ब्राह्मण संघाचे अध्यक्ष अनंत पाटील, स्वामी समर्थ मठाचे संस्थापक संदीपदादा म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवर आणि संगीतप्रेमी उपस्थित होते. मंडळाचे मार्गदर्शक सुभाष वझे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेकडून कार्यक्रमासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आरोग्य सभापती नीलेश देशमुख यांचे मंडळाच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.
नांदीने सुरुवात, भैरवीने सांगता
‘नमन नटवरा’ या नांदीने कार्यक्रमाची सुरुवात झाली, तर ‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर’ या भैरवीने सुरेल मैफलीची सांगता झाली.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply