दिवाळीतील आगीच्या घटनांनी यंदा नाशिक शहरात रेकॉर्ड ब्रेक केला आहे. गेल्या २४ तासात ५० हून अधिक आगीच्या घटना घडल्या आहेत. शहराच्या प्रत्येक भागात एक तरी आगीची घटना घडली आहे. मुख्यालय, सिडको आणि पंचवटी येथील सर्वाधिक घटनांचा समावेश आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वाधिक आग लागण्याचे प्रकार घडतात. यामुळे अग्निशमन मुख्यालयासह सर्वच विभागातील केंद्रांवर अग्निशमन पथक हाय अलर्टवर होते. त्यांच्या तत्परतेमुळे मोठ्या प्रमाणावर आगीच्या घटना घडूनही कुठलीही जीवितहानी झाली नाही. केवळ एका घटनेत गाईचे वासरू जखमी झाले.
आग कुठे कुठे लागली
लक्ष्मीपूजन आटोपताच सर्वत्र फटाक्यांची जोरदार आतशबाजी झाली. आतशबाजीने फटाक्याचे विस्तव पडून विविध ठिकाणी आग लागल्या. मैदानावर वाढलेली झाडीझुडपे, कचरा, मोठे झाडे, जंगल परिसरातील झाडे, भंगार साहित्य, गोठा, पालापाचोळा अशा विविध भागात फटाक्यांच्या विस्तवाने आग लागल्या. हिरावाडी भिकुसा मिल परिसर आणि कॉलेज रोड येथील मोकळ्या मैदानावर आग लागली. सातपूर येथील कंपनीसह पंचवटी येथील भिकुसा मील यात लागलेल्या आगीत नुकसान झाले आहे. मोकळ्या मैदानावरील झुडपे आणि कचरा, वृक्षांना आग लागण्याचे सर्वाधिक प्रकार आहेत. कॉलेज रोड, मदिना चौक, राजीवनगर येथील मोकळे मैदान, देवळाली मिलिटरी कंपाऊंडमधील जंगल देखील आगीच्या कचाट्यातून सुटलेले नाही.
नोंद आणि धावपळ
अग्निशमन विभागात अधिकृतरीत्या ५० घटनांची नोंद आहे. मात्र काही केंद्रांवर परस्पर आगीचे कॉल झाल्याने आगीच्या घटना ५० हून अधिक झाल्या आहेत. सतत आगीचे कॉल येत असल्याने केंद्रांवरील भ्रमणध्वनी खणखणत होते, तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांची प्रत्येक कॉल अटेंड करताना धावपळ होताना दिसून आली. केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणावर आग लागण्याच्या घटना घडल्याने यंदा आगीचे रेकॉर्ड ब्रेक झाले आहे. असे असताना नागरिकांनी फटाके फोडण्यासंदर्भात काळजी न घेता घडलेल्या घटनेची गंमत पाहण्यासाठी गर्दी केली. काहींनी तर चक्क आगीचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसारित केले.
पंचवटी रामतीर्थ परिसर, सिडको, अंबड इतर विविध भागात फटाक्यांची आतशबाजी करणाऱ्या काही तरुणांसह टवाळखोरांची हुल्लडबाजी अनेकांच्या अंगलट आली. त्यांच्याकडून एकमेकांच्या अंगावर जळके फटाके फेकणे, रॉकेट सोडणे असे प्रकार केले जात असल्याने आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली. काहींचे कपडे जळाले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply