दिवाळीच्या रात्री मुंबई आणि ठाण्यात ठिकठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या. डोंगरी, कुर्ला, विद्याविहार, जोगेश्वरी, कांदिवली, अंधेरी, चेंबूर आणि भिवंडी अशा अनेक भागांत आगीचे सत्र पाहायला मिळाले. ठाण्यातील एका उंच इमारतीला लागलेली आग सर्वांत भीषण होती. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र घरांचे आणि दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे.
ठाण्यातील १७ मजली इमारतीला आग
ठाण्यातील वागळे इस्टेट भागात असलेल्या रहेजा गार्डन संकुलातील कार्लाइल या १७ मजली इमारतीला रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास भीषण आग लागली. आठव्या मजल्यावर लागलेली आग काही वेळातच चौदाव्या मजल्यापर्यंत पसरली. ठाणे आणि मुंबई अग्निशमन दलाच्या १० ते १५ गाड्यांनी सहा तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. आपत्ती व्यवस्थापन विभागाने इमारतीत अडकलेल्या ५० हून अधिक रहिवाशांना आणि त्यांच्या पाळीव प्राण्यांना सुखरूप बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली. आतापर्यंत २० ते २५ जणांना बाहेर काढण्यात आले असून, आणखी पाच जणांना प्राथमिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीत अनेक घरांतील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनेची पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अग्निशमन दलाच्या कामगिरीचे कौतुक केले आणि दिवाळीतील फटाक्यांसंदर्भात कठोर नियमावलीचे निर्देश दिले. त्यानुसार ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी ठाणे जिल्ह्यात रॉकेट आणि हवेत आतिशबाजी करणाऱ्या फटाक्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. इतर फटाके केवळ खुल्या मैदानातच फोडण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
मुंबई आणि भिवंडीतही आगीच्या घटना
मुंबईतील डोंगरी परिसरातील डॉ. महेश्वरी रोडवर हाजी कासम चाळीजवळील एका गॅरेजला रात्री दहाच्या सुमारास आग लागली. काही तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या आगीत १० ते १२ दुकाने जळून खाक झाली. जवळच्या तीन रहिवासी इमारती तातडीने रिकाम्या करण्यात आल्या आणि वीजपुरवठा काही काळ खंडित करण्यात आला होता. चेंबूर येथील मैत्री पार्क परिसरात फटाक्यांची ठिणगी उडाल्याने एका झाडाला आग लागली. आगीवर वेळीच नियंत्रण मिळाल्याने मोठा अनर्थ टळला. विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळील स्कायलाईन विहार या व्यापारी इमारतीच्या वरच्या दोन मजल्यांनाही आग लागली. अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला बॅक रोडवरील ओबेरॉय स्काय हाईट या निर्माणाधीन इमारतीला लागलेल्या आगीत तेथे राहणाऱ्या कामगारांची जीव वाचवण्यासाठी मोठी धावपळ उडाली. ओशिवरा पोलिसांनी आणि कामगारांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
भिवंडीतही आगीच्या तीन घटना घडल्या. कामतघर गणेशनगर येथील बॅग विक्रीच्या दुकानात लक्ष्मीपूजनानंतर लावलेल्या एका दिव्यामुळे आग लागली आणि दुकानातील सर्व बॅग साहित्य जळून खाक झाले. कामतघर ओसवालवाडी येथे फटाका उडून लागलेल्या आगीत लाकडी बॅट बनवणारा कारखाना जळून खाक झाला. कारखान्यातील संपूर्ण यंत्रसामग्री आणि लाकडी साहित्य आगीत नष्ट झाले. जवळच असलेल्या मंडप सजावटीच्या साहित्याच्या गोदामातील साहित्य स्थानिकांनी तातडीने बाहेर काढल्याने ते वाचले. गौरीपाडा येथे भंगार गोदामात लागलेली आग पहिल्या मजल्यावरील घरापर्यंत पोहोचली. त्यात चाळीतील पाच खोल्या जळून खाक झाल्या. यापैकी तीन घरे रिकामी होती, तर दोन घरांतील कुटुंबीयांना स्थानिकांनी आग लागताच बाहेर काढल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply