छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बसस्थानकावर रविवारी पहाटेपासून दिवाळीचा आगळावेगळा आनंद पाहायला मिळाला. बाहेरगावाहून रात्री उशिरा आलेल्या मुक्कामी बसेसच्या चालक आणि वाहकांसाठी अभ्यंगस्नानाची खास व्यवस्था करण्यात आली होती. कर्तव्यामुळे घरी जाऊन सण साजरा करता येत नसलेल्या कर्मचाऱ्यांना सणाचा आनंद देता यावा, हा या उपक्रमामागचा हेतू होता.
पहाटे चारपासून सनईचे सूर आणि उटण्याचा दरवळ
रविवारी (ता. ८) पहाटे चार वाजल्यापासून चालक-वाहक विश्रांतीगृहाच्या परिसरात सनईचे मंगलमय सूर घुमत होते. उटण्याचा दरवळ आणि पारंपरिक वातावरणामुळे संपूर्ण परिसरात चैतन्य निर्माण झाले होते. मुक्कामी थांबलेल्या बाहेरगावच्या चालक-वाहकांना सुगंधी उटणे देण्यात आले. अभ्यंगस्नानानंतर सर्वांना चहा आणि दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. ड्यूटीमुळे घरी राहता येत नसल्याने अभ्यंगस्नान आणि फराळाचा आनंद घेता येत नसल्याची खंत कर्मचाऱ्यांना होती; मात्र या उपक्रमामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित
या कार्यक्रमाला आगार व्यवस्थापक संजय चव्हाण आणि रणजित राजपूत, स्थानक प्रमुख संतोष नजन, सहायक वाहतूक निरीक्षक बाबासाहेब साळुंखे यांच्यासह घनश्याम मस्के, उद्धव भोळे, भगवान शेवाळे, युसूफ आणि प्रकाश झिंजुर्डे उपस्थित होते. अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी झाले होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply