छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेंद्रा-बिडकीन ते ढोरेगाव या औद्योगिक ग्रीनफील्ड महामार्गाच्या कामाला वेग आला आहे. या मार्गासाठी जमिनीची मोजणी पूर्ण झाली असली, तरी मोजणीदरम्यान रस्त्याच्या आखणीत २५ नवे गट आल्याचे समोर आले आहे. या नव्या गटांतील जमिनीची मोजणी दिवाळीनंतर केली जाणार असून, त्यानंतर अंतिम अधिसूचना जारी होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर हे आशिया खंडातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक मानले जाते. मराठवाड्याची राजधानी असलेल्या या शहरात औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली आहेत. या महामार्गामुळे शेंद्रा-बिडकीन आणि ऑरिक सिटीतील उद्योगांना पुणे व मुंबईतील औद्योगिक वसाहतींशी जलद संपर्क मिळणार आहे. शेंद्रा-करमाड-बिडकीन आणि ढोरेगाव या ग्रीनफील्ड महामार्गाच्या कामाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली असून, केंद्र व राज्य शासनाकडून आवश्यक परवानग्या तातडीने दिल्या जात आहेत.
तीन तालुक्यांतील ५२ गावांतून जाणार मार्ग
हा मार्ग जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर, पैठण आणि गंगापूर या तीन तालुक्यांतील ५२ गावांमधून जात आहे. भूसंपादनासाठी तिन्ही तालुक्यांसाठी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे, छत्रपती संभाजीनगरचे उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड आणि पैठण-फुलंब्रीच्या उपविभागीय अधिकारी निलम बाफना यांच्याकडे भूसंपादन अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांनी मोजणीची प्रक्रिया सुरू करून ती पूर्ण केली आहे.
नववर्षात प्रत्यक्ष भूसंपादन
नव्या गटांची मोजणी झाल्यानंतर दाखल झालेले आक्षेप आणि त्यावरील सुनावणी पूर्ण करून भूसंपादनाचा निवाडा जाहीर केला जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेला किमान तीन महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नववर्षातच या रस्त्यासाठी प्रत्यक्ष भूसंपादन सुरू होईल, अशी माहिती प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply