शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची विचारपूस करण्यासाठी प्रफुल पटेल रुग्णालयात गेले होते. काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. दोन्ही नेत्यांमध्ये राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर बोलणे झाल्याची चर्चा सुरू झाली होती.
विलीनीकरणावर चर्चा झाली नाही – पटेल
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार यांना साथ देणाऱ्या प्रफुल पटेल यांनी अमित शहा यांच्यानंतर शरद पवार यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या भेटीवर प्रफुल पटेल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रफुल पटेल आणि शरद पवार यांच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दोन्ही नेते बराच वेळ चर्चा करताना दिसत होते. या व्हिडिओमध्ये १० तारखेला भेटणार असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या १० तारखेच्या भेटीत विलीनीकरणाची चर्चा होणार का, यावर तर्कवितर्क लढवले जात होते. मात्र पटेल यांनी ही चर्चा फेटाळून लावली.
पटेल नेमके काय म्हणाले?
शरद पवार हे रुग्णालयात दाखल होते. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची माहिती घेण्यासाठी रुग्णालयात गेलो होतो, असे पटेल म्हणाले. वर्षानुवर्षे शरद पवार यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली असून त्यांचे आशीर्वाद नेहमीच लाभले, असेही ते म्हणाले. खूप चांगल्या वातावरणात भेट झाली असून ईश्वराच्या कृपेने त्यांची तब्येत बरी झाली आहे आणि आता ते घरी गेले आहेत, असे पटेल यांनी सांगितले.
भेटल्यानंतर थोडीफार चर्चा होणे स्वाभाविक असले तरी ती चर्चा काही विशेष नव्हती, असे पटेल म्हणाले. दिवाळीत ८ आणि ९ तारखेला ते गोंदियात असून १० तारखेनंतर मुंबईत येतील, तेव्हा भेटण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णालयात फार काही चर्चा करता येत नाही आणि तिथे चर्चा योग्यही नव्हती, असेही ते म्हणाले. पवारांप्रति आदर होता आणि सदैव राहणार असून त्यांची प्रकृती चांगली राहावी ही सगळ्यांची इच्छा असल्याचे पटेल म्हणाले. १० तारखेला मुंबईत आल्यावर चर्चा करू, पण ती चर्चा राजकीयच असेल असे काही नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply