कोकणातील दिवाळी सणाला कृषी संस्कृती आणि निसर्गाप्रती कृतज्ञतेची परंपरा लाभली आहे. नरक चतुर्दशीपासून सुरू होणारा हा उत्सव तुळशीविवाहापर्यंत चालतो. अभ्यंगस्नान, ग्रामदैवताचे दर्शन आणि नव्या भातापासून तयार केलेल्या फराळातून कोकणातील पारंपरिक जीवनशैलीचे दर्शन घडते. कृषी संस्कृतीचा वारसा जपत हा सण साजरा केला जातो.
नरक चतुर्दशीपासून तुळशीविवाहापर्यंत
नरक चतुर्दशीच्या आदल्या दिवसापासून आकाशकंदील आणि पणत्यांनी घरांची सजावट केली जाते. पहाटे उटण्याने अभ्यंगस्नान करून कंराटीचे फळ पायाखाली चिरडण्याची प्रथा आहे. वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा स्वीकार करण्याचा त्यामागील संकेत आहे. त्यानंतर तुळशीला वंदन केले जाते. नवीन भातापासून तयार केलेले पोहे, गूळ किंवा साखर, ओले खोबरे आणि करंजी असा पारंपरिक फराळ केला जातो. मात्र, आता तयार चिवड्याने पोह्यांची जागा घेतली आहे.
कमी पावसाची उत्सवावर छाया
दिवाळीच्या दिवशी फराळापूर्वी ग्रामदैवताचे दर्शन घेण्याची प्रथा आजही अनेक गावांत कायम आहे. यंदा कमी पर्जन्यमानामुळे भाताचे उत्पादन अपेक्षेप्रमाणे न झाल्याने उत्सवावर त्याचा परिणाम जाणवत आहे. तरीही नव्या पिढीकडून परंपरा जपण्याचा प्रयत्न सुरू आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply