चाळीसगाव शहरात दिवाळीच्या निमित्ताने बाजारात भेसळीचे विविध पदार्थ विकले जात असल्याची बाब अन्न व औषध प्रशासनाच्या लक्षात आली. विभागाने याची गंभीर दखल घेत दोन दिवसांत शहरातील मिठाई व फरसाण विक्री करणाऱ्या ११ दुकानांची चौकशी केली. या दुकानांतील पदार्थांचे नमुने घेऊन ते छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
आठ ठिकाणांहून नमुने घेतले
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत ही विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. शहरातील मिठाई, फरसाण, खाद्यतेल तसेच प्रतिबंधित पदार्थांची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांच्या दुकानांची तपासणी करण्यात आली. शहरातील चार प्रसिद्ध मिठाई व फरसाण विक्रेत्यांसह चार केटरर्स अशा एकूण आठ ठिकाणी तपासणी करून खाद्यपदार्थांचे नमुने संकलित करण्यात आले. दिवाळीत मिठाई, फरसाण, खाद्यतेल आणि इतर खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री होते. या काळात मिठाईवर चांदीचा वर्ख लावला जातो. मात्र, हा वर्ख खऱ्या चांदीचा आहे की बनावट किंवा आरोग्यास अपायकारक घटकांपासून तयार केलेला आहे, याची पडताळणी करणेही तपासणी मोहिमेचा महत्त्वाचा भाग आहे.
खाद्यतेलाचीही तपासणी
काही दिवसांपूर्वी शहरात दोन ठिकाणी पॅकिंगमधील खाद्यतेलाची तसेच गुळाची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी तेलाचे नमुने घेऊन तेही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी सांगितले. मिठाई व फरसाणाबरोबरच खाद्यतेलाच्या गुणवत्तेवरही प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. तपासणीदरम्यान दुकानांमध्ये काही त्रुटी आढळल्या का, तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक किंवा अन्य कारवाई करण्यात आली का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. सध्या केवळ नमुने घेऊन तपासणी करण्यात आली असल्याने प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच दोषी आढळलेल्यांवर नियमानुसार कारवाई होणार आहे. त्यामुळे या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांवर दुकाने थाटून विविध खाद्यपदार्थ कमी दरात विकले जात आहेत. तेलाचे भाव १५० ते १६० रुपये किलो असताना शेव, फरसाण यांसारखे काही खाद्यपदार्थ केवळ १२० ते १३० रुपये किलो दराने विकले जात आहेत. कमी दरात विकले जाणारे हे खाद्यपदार्थ आरोग्यासाठी कसे चांगले असू शकतात, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यासंदर्भात प्रशासनाने या विक्रेत्यांचीही चौकशी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply