मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते विद्याधर जोशी म्हणजेच प्रेक्षकांचे लाडके ‘बाप्पा’ जोशी यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांत आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर मोठे आरोग्यसंकट ओढावले होते. एका गंभीर फुफ्फुसाच्या आजारामुळे त्यांना मृत्यूशी झुंज द्यावी लागली. अखेर फुफ्फुस प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर त्यांना नवे आयुष्य मिळाले. एका मुलाखतीत त्यांनी या कठीण काळातील अनुभव सांगितला होता.
सुरुवातीची लक्षणे आणि निदान
‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत विद्याधर जोशी यांनी सांगितले की, आजारपणाच्या सुरुवातीच्या दिवसांत त्यांना काहीच माहीत नव्हते. व्यायाम करताना किंवा इमारतीचे मजले चढताना नेहमीपेक्षा जास्त थकवा जाणवत होता. त्यांचे चुलत भाऊ डॉक्टर असल्याने त्यांनी आधी त्यांना याबद्दल सांगितले. मात्र त्यांनी ‘साठी झाली’ असे म्हणत याकडे फार लक्ष दिले नाही. कोविडची लाट ओसरल्यानंतर त्रास अधिक जाणवू लागला. पंधरा-पंधरा दिवसांच्या अंतराने त्यांना दोन वेळा कोविडची लागण झाली होती. कोविड बरा होऊनही ताप पूर्णपणे जात नव्हता. त्यामुळे त्यांनी रीतसर डॉक्टरांचा सल्ला घेतला. सिटीस्कॅनमध्ये डॉक्टरांना फुफ्फुसावर जखम झाल्याचे दिसून आले. पुण्याच्या एका डॉक्टरांनी हा कोविडचा पॅच नसून काहीतरी वेगळे असल्याचे सांगितले. या काळात सुरुवातीपेक्षा अधिक दम आणि थकवा लागत होता.
शेवटी ते भाटिया रुग्णालयातील डॉ. सुजीत राजन यांच्याकडे गेले. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना लंग्ज फायब्रोसिस झाल्याचे सांगितले. इंटरस्टिशियल लंग डिसीज (आयएलडी) असे या आजाराचे संपूर्ण नाव होते. इतर आजारांत लोक बरे होऊन पुन्हा कामाला लागतात, असे त्यांनी ऐकले होते. मात्र या आजारावर कोणताही उपाय नाही, असे डॉक्टरांनी सांगितले. यावर औषध नाही आणि हा आजार थांबवताही येत नाही, असे कळल्यावर ते थोडेसे घाबरले. पहिल्या तपासणीत त्यांचे फुफ्फुस जवळपास १३ टक्के निकामी झाले होते आणि पुढे ते आणखी निकामी होईल, अशी कल्पना त्यांना देण्यात आली होती. हळूहळू डॉक्टरांशी चर्चा केल्यावर त्यांना आजाराबद्दल संपूर्ण माहिती मिळाली.
प्रत्यारोपण हाच शेवटचा पर्याय
मनाची तयारी करून त्यांनी वैयक्तिक आयुष्यात उभारी घेतली होती. मात्र हळूहळू गोष्टी अधिक बिकट झाल्या आणि त्रास वाढू लागला. शेवटी डॉक्टरांनी फुफ्फुसांचे प्रत्यारोपण करणे हाच शेवटचा उपाय असल्याचे सांगितले. देशात फक्त हैदराबाद, चेन्नई आणि मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात ही शस्त्रक्रिया होते, असे डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते. त्यानंतर कोणीतरी अवधूत गुप्ते यांच्या जवळच्या नातेवाईकांमध्ये ही शस्त्रक्रिया झाल्याचे त्यांना सांगितले. अवधूत यांनी फोनवर त्यांना या शस्त्रक्रियेचे गांभीर्य आणि ती नेमकी काय आहे, याची माहिती दिली. यासाठी खूप पैसे लागतात, असेही त्यांनी सांगितले. खर्चाची आकडेवारी ऐकल्यावर विद्याधर जोशी यांनी पत्नीला ‘या वयात एवढे पैसे खर्च करून काय करणार?’ असेही म्हटले होते. त्यामुळे पुढचे सर्व आर्थिक नियोजन त्यांच्या कुटुंबीयांनी बघितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply