खेड तालुक्यातील पोयनार धरणाच्या भूमिपूजन सोहळ्यात खुर्चीवरून निर्माण झालेला वाद आता थेट आरोप-प्रत्यारोपांच्या पातळीवर पोहोचला आहे. जिल्हा परिषद सदस्य अजय बिरवटकर यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांना जोरदार शब्दांत प्रत्युत्तर दिले असून, त्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील तणाव आणखी वाढला आहे.
बिरवटकर हे खासदार सुनील तटकरे यांचे मेहुणे आहेत. भूमिपूजनाच्या कार्यक्रमात त्यांना खुर्चीवरून सुनावण्यात आले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना बिरवटकर म्हणाले की, व्यासपीठावरील खुर्ची कोणाचीही असली, तरी पोयनार हे आपले गाव आहे आणि ती आपली जन्मभूमी आहे. त्या ठिकाणी आपण त्याच पद्धतीने उत्तर देऊ शकलो असतो, मात्र चिखलात दगड मारण्याची आपली पद्धत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
समाजमाध्यमावरील पोस्टमधूनही नाराजी
कार्यक्रमात झालेल्या प्रकारानंतर बिरवटकर यांनी समाजमाध्यमावर पोस्ट लिहून आपली नाराजी व्यक्त केली होती. उतरत्या काळात माणसाची अशीच आगपाखड सुरू होते, अशी बोचरी टीका त्यांनी या पोस्टमध्ये केली. आभाळ गाठण्याची जिद्द असली तरी पाय जमिनीवर राहतील, मात्र स्वाभिमानाला ठेच लागली तर बाजार उठवला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दापोली विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना बिरवटकर म्हणाले की, राज्यात महायुती अभेद्य आहे. मात्र दापोली मतदारसंघात जे काही सुरू आहे, ते विश्वासात न घेता सुरू आहे. भविष्यात आम्ही ते दाखवून देऊ, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे कदम यांना इशारा दिला.
वादाची पार्श्वभूमी काय?
खेड तालुक्यातील पोयनार लघु पाटबंधारे प्रकल्प २५ वर्षांपासून रखडला होता. तब्बल ७२ हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याच्या चौकशीत हा प्रकल्प अडकला होता. या प्रकल्पासाठी आता २६७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्याचे भूमिपूजन नुकतेच पार पडले. या सोहळ्याला गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि रामदास कदम उपस्थित होते.
कार्यक्रमात रामदास कदम यांनी आपल्या मुलाचे कौतुक करताना सुनील तटकरे यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधला होता. त्याच कार्यक्रमात बिरवटकर यांना खुर्चीवरून सुनावण्यात आले. ‘बसायचं तर बस, नाहीतर जा,’ असे शब्द कदम यांनी वापरल्याचे सांगितले जाते. दरम्यान, भूमिपूजनासाठी तटकरेंचा अपमान करण्याचा हेतू नव्हता आणि जलपूजन त्यांच्याच हस्ते केले जाईल, असे स्पष्टीकरण रामदास कदम यांनी याआधी दिले होते. मात्र बिरवटकर यांच्या प्रत्युत्तरामुळे या राजकीय वादात आणखी भर पडली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply