भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे सध्या त्यांनी केलेल्या रॅम्प वॉकवरून विरोधकांच्या निशाण्यावर आहेत. मुंबईतील ग्रँड हयात येथे सुरू असलेल्या बॉम्बे टाइम्स फॅशन वीकमध्ये त्यांनी रॅम्प वॉक केला होता. राज्यात शेतकरी दुष्काळाने होरपळत असताना मंत्री रॅम्प वॉक करण्यात व्यस्त असल्याची टीका त्यांच्यावर होत आहे. या टीकेला आता मुंडे यांनी स्वतः उत्तर दिले आहे.
रॅम्प वॉक का केला?
काही दिवसांपूर्वी ‘जालनाई’ या ब्रँडचे उद्घाटन करण्यात आले होते. तिथे सुंदर वस्त्रे बनवून ती बाहेर विकली जातात. त्या ब्रँडसाठी आपण रॅम्प वॉक केला होता, असे मुंडे यांनी सांगितले. तो वॉक फॉर कॉज होता आणि त्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी केला होता. यावरून विरोधक टीका करत असतील तर ते दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले. बीडने साडी दिली तर बीडमध्येही साडी घालून रॅम्प वॉक करेन, असेही त्यांनी सांगितले. रेशीम उद्योगाच्या दृष्टीने जालन्यासोबतच बीडमध्येही प्रोत्साहन देण्यासाठी काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दुष्काळावर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी
यावेळी बोलताना मुंडे यांनी दुष्काळाच्या परिस्थितीवरही भाष्य केले. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात दुष्काळाच्या अनुषंगाने त्यांनी बैठक घेतली. ही बैठक प्रामुख्याने चारा आणि पाण्याच्या अनुषंगाने होती. दुष्काळ सर्वांवर आला असून त्यातून मार्ग काढण्यासाठी काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील वर्षी टँकरची गरज पडू नये यासाठी उपाय केले होते, यंदाही हाच प्रयत्न असणार आहे.
दरम्यान, बीड जिल्हाधिकारी कार्यालयात मुंडे यांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. प्रशासनाने सजग आणि सतर्क राहून काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतीन रहेमान, निवासी उप जिल्हाधिकारी शिवशंकर स्वामी तसेच कृषी, पशुसंवर्धन, महावितरण आणि जलसंधारण विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply