बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याच्या आगामी ‘किंग’ चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीच चर्चा रंगू लागली आहे. मात्र यावेळी चित्रपटाच्या कथेमुळे किंवा कलाकारांमुळे नव्हे, तर एका गाण्यातील दीपिका पदुकोणच्या पोशाखामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ‘तू मिल जाये’ या गाण्यात दीपिका भगव्या रंगाचा पोशाख परिधान करून दिसत आहे. तिच्या या लूकवर दिल्लीतील पटपडगंज मतदारसंघाचे भाजप आमदार रवींद्र सिंग नेगी यांनी आक्षेप घेतला आहे. गाण्यातील दृश्य न हटवल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.
भगव्या ड्रेसवर आमदारांचा आक्षेप
‘किंग’ चित्रपटातील ‘तू मिल जाये’ या गाण्यात दीपिका पदुकोण भगव्या रंगाचा पोशाख परिधान करून नृत्य करताना दिसते. याच दृश्यावरून भाजप आमदार रवींद्र सिंग नेगी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एका मुलाखतीत त्यांनी हा प्रकार सनातन धर्माला बदनाम करण्याचा कट असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी शाहरुख खानवरही निशाणा साधला. शाहरुख खान आणि देशातील हे सर्व जिहादी देशातून पैसे कमावतात आणि देशाची बदनामी करतात, असा आरोप त्यांनी केला. त्यांना भगव्या रंगाचा प्रॉब्लेम आहे आणि दीपिका पदुकोण केवळ एक प्यादी आहे, असेही ते म्हणाले. हे जिहादी त्यांच्या मागे आहेत आणि मी शाहरुख खानला जिहादीच म्हणेन, असे वादग्रस्त विधानही त्यांनी केले.
दृश्य न हटवल्यास देशभर आंदोलनाचा इशारा
रवींद्र सिंग नेगी यांनी शाहरुख खानला थेट इशारा दिला आहे. ‘तू मिल जाये’ या गाण्यातील दीपिकाचा पोशाख आणि नृत्याची पद्धत सनातन धर्माला शोभणारी नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे गाण्यातील संबंधित दृश्य बदलण्याची मागणी त्यांनी केली आहे. जर हे दृश्य बदलले नाही, तर देशभरात आंदोलने होतील आणि सनातन धर्माच्या विरोधात काहीही सहन केले जाणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे ‘किंग’ चित्रपटाभोवतीचा वाद आणखी चर्चेत आला आहे.
‘पठाण’ चित्रपटाच्या वादाची पुन्हा आठवण
या संपूर्ण प्रकरणाची तुलना शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाशी केली जात आहे. जवळपास तीन वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यात दीपिका पदुकोणने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केली होती. तिच्या या पोशाखावरून त्यावेळी मोठा वाद निर्माण झाला होता. अनेक हिंदू संघटनांनी या गाण्याला विरोध करत आंदोलन केले होते. आता पुन्हा एकदा शाहरुख खानच्या चित्रपटातील दीपिकाच्या भगव्या पोशाखावरून वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे ‘किंग’ चित्रपटातील हे दृश्य बदलले जाणार का आणि या प्रकरणावर शाहरुख खान किंवा चित्रपटाच्या निर्मात्यांकडून काही प्रतिक्रिया येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply