पोलादपूर तालुक्यातील शेतकऱ्यांवर यंदा भात हंगामाचे मोठे संकट ओढवले आहे. पावसाअभावी आधीच ७० ते ८० टक्के भातपिकाचे नुकसान झाले होते. त्यात कापणीला आलेले उरलेले पीकही अवकाळी पावसामुळे जमिनीवर आडवे झाले आहे. त्यामुळे यंदाचा भात हंगाम पूर्णपणे संकटात सापडला आहे.
जिल्हा परिषदेचे कृषी व शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे यांनी देवळे विभागात बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दोन महिने पावसाने दडी मारली
पोलादपूर तालुक्यातील बहुतांश शेतकरी भातशेतीवर अवलंबून असून अनेकांची शेती एकपिकी आहे. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने रोपे करपली आणि पिकाची वाढ खुंटली. त्यातून वाचलेले पीक घरात आणण्याची तयारी सुरू असतानाच गेल्या दोन दिवसांत झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. जनावरांसाठी चारा आणि पुढील हंगामासाठी आर्थिक तरतूद करण्याचेही संकट निर्माण झाले आहे.
लोकप्रतिनिधींचा पाहणी दौरा
पंचायत समितीचे सभापती अविनाश शिंदे आणि सदस्य अनिल दळवी यांच्यासह कळंबे यांनी देवळे विभागात पाहणी केली. उरलेले सुमारे २० टक्के पीकही पावसामुळे पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलादपूर प्रेस क्लब आणि विविध संस्थांनी यापूर्वीच दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, असे आवाहन कळंबे यांनी केले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply