नैना क्षेत्रातील गावांच्या विकासकामांना गती देण्यासाठी शासकीय जमिनी ग्रामपंचायतींना उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. शिवकर गावाचा प्रलंबित गावठाण विस्ताराचा प्रश्नही मार्गी लावावा, अशी त्यांची मागणी आहे. यासंदर्भात त्यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.
सार्वजनिक सुविधांसाठी जागेची अडचण
नैना क्षेत्रातील गावांमध्ये शाळा, आरोग्य केंद्रे, क्रीडांगणे तसेच अन्य सार्वजनिक सुविधा उभारण्यासाठी जागेची कमतरता भासत आहे. त्यामुळे गुरचरण, गायरान आणि अन्य शासकीय जमिनी संबंधित ग्रामपंचायतींना उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ठाकूर यांनी केली. ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी जागेचा प्रश्न प्राधान्याने सोडविणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवकर गावठाण विस्ताराचा प्रश्न
शिवकर येथील सर्व्हे क्रमांक १२९ मधील ०८-३०-८० हेक्टर क्षेत्रावरील गावठाण विस्ताराचा प्रश्नही त्यांनी महसूलमंत्र्यांसमोर मांडला. १९३९ पासून अस्तित्वात असलेली गावठाणाची रचना, गावकऱ्यांची निवासी घरे, यापूर्वी झालेला गावठाण विस्तार आणि महसूल अभिलेखातील गुरचरण नोंदी यांमधील विसंगतीमुळे हा प्रश्न प्रलंबित असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. दोन्ही विषयांचे गांभीर्य लक्षात घेऊन महसूलमंत्र्यांनी जिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. या वेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा सरपंच आनंद ढवळे आणि संबंधित ग्रामपंचायतींचे सदस्य उपस्थित होते. दोन्ही प्रश्नांसाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply