राष्ट्रीय महामार्गावर होणाऱ्या अपघातांमधील जीवितहानी रोखण्यासाठी आणि अपघातग्रस्तांना वेळेत आवश्यक वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५३ वर दोन आधुनिक लाइफ सपोर्ट रुग्णवाहिका उपलब्ध करण्याची शिफारस जिल्हा रस्ते सुरक्षा समितीने केली आहे.
समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जळगाव प्रकल्प अंमलबजावणी कार्यक्षेत्रात या रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याबाबत शिफारस करण्यात आली आहे.
गोल्डन अवरमध्ये उपचार निर्णायक
राष्ट्रीय महामार्ग ५३ हा पूर्व-पश्चिम मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीचा महत्त्वाचा दुवा आहे. या मार्गावर आंतरराज्यीय तसेच राज्यांतर्गत वाहनांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे अपघात झाल्यास जखमींना तातडीने वैद्यकीय मदत मिळणे अत्यंत आवश्यक ठरते. अपघातानंतरचा पहिला तास, म्हणजेच गोल्डन अवर, हा जखमींचे प्राण वाचवण्याच्या दृष्टीने निर्णायक असतो. या काळात योग्य उपचार मिळाल्यास जीवितहानी टाळण्यास मोठी मदत होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन महामार्गावरील आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिक सक्षम करण्याची भूमिका समितीने घेतली आहे.
अत्याधुनिक यंत्रणा आणि प्रशिक्षित कर्मचारी
सध्या महामार्गावर उपलब्ध असलेल्या रुग्णवाहिका सुविधांवर गंभीर अपघातांमधील आपत्कालीन वैद्यकीय प्रतिसादाची वाढती गरज लक्षात घेता अतिरिक्त दोन अॅडव्हान्स लाइफ सपोर्ट रुग्णवाहिका देण्यात येणार आहेत. या रुग्णवाहिका अत्याधुनिक जीवनरक्षक उपकरणे आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी सुसज्ज असणार आहेत. त्यामुळे अपघातस्थळीच जखमींना प्राथमिक तसेच आवश्यक वैद्यकीय उपचार देणे शक्य होणार आहे. महामार्गावरील अपघातांमधील जीवितहानी कमी करणे, आपत्कालीन मदत मिळण्यास लागणारा वेळ घटवणे आणि प्रवाशांची सुरक्षितता जपणे, या व्यापक उद्देशाने ही शिफारस करण्यात आली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply