दरवर्षाप्रमाणे जळगाव शहर वृत्तपत्र विक्रेता मंडळातर्फे गुरुवारी वृत्तपत्र वाटप करणारे आणि वृत्तपत्र विक्रेते बांधवांसाठी दिवाळीनिमित्त स्नेहमिलन व मिठाईवाटप कार्यक्रम सायंकाळी केमिस्ट भवन येथे झाला. वृत्तपत्र विक्रेता विकास फाउंडेशनतर्फे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक विशाल भोळे, महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनील भंगाळे, जैन उद्योग समूहाचे मीडियाप्रमुख अनिल जोशी आणि शिवसेना जळगाव विधानसभा क्षेत्रप्रमुख श्याम कोगटा उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक केले. जोशी यांनी मार्गदर्शन केले व मंडळास योग्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले. गोपाळ चौधरी यांनी प्रास्ताविकात मंडळाच्या कार्याची माहिती दिली. या कार्यास अनेक वर्षांपासून उपस्थित मान्यवरांसह गुजरात स्वीटचे संचालक नीलेश मदानी योग्य ती मदत करीत असल्याने त्यांचे आभार मानण्यात आले.
सत्कार आणि मिठाईवाटप
सुनील भंगाळे यांची महाराष्ट्र राज्य केमिस्ट असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल फाउंडेशनतर्फे अध्यक्ष प्रा. नितीन चौधरी व पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वृत्तपत्र विक्रेता बांधवांनी विचारांची देवाणघेवाण केली. प्रा. नितीन चौधरी, रवींद्र जोशी, विलास वाणी, भालचंद्र वाणी, अनिल पाटील, वसंत गायकवाड, उपाध्यक्ष विशाल वाणी, संजय चौधरी, सचिव विजय कोतकर आणि अर्जुन पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमात सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांना मिठाई व फरसाण वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळाचे तुषार चौधरी, महेश सोनार, हरीश चौधरी, दिनेश वाणी, हिरालाल टेकावडे, किशोर साळुंखे आणि राकेश सोनार यांनी परिश्रम घेतले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply