नाशिक जिल्ह्यात वंचित घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने चित्ररथ उपक्रम सुरू केला आहे. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते या चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
चित्ररथातून गावागावांत माहिती
सामाजिक न्याय विभाग अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबवतो. या योजनांची माहिती, त्यासाठी लागणारी पात्रता, अर्ज करण्याची प्रक्रिया आणि उपलब्ध सुविधा चित्ररथात सोप्या व प्रभावी पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विशेष घटक योजनेतून जिल्हा माहिती कार्यालयाकडून हा जनजागृती उपक्रम राबवला जात आहे. चित्ररथ जिल्ह्यातील गावागावांत जाऊन थेट जनजागृती करणार आहे.
समताधिष्ठित समाजनिर्मितीचे उद्दिष्ट
समताधिष्ठित समाजनिर्मितीला बळ देत वंचित व दुर्बल घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. पात्र व्यक्तींपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवणे हे व्यापक उद्दिष्ट असून चित्ररथाचा उपक्रम त्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. लोकार्पण प्रसंगी अपर जिल्हाधिकारी हेमांगी पाटील, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ व अभिजित नाईक, समाजकल्याणचे सहायक आयुक्त देविदास नांदगावकर, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी दत्ता आव्हाड, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके आणि माहिती अधिकारी गोपाल साळुंखे उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply