सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित अन्न मिळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक विभागाने शहर आणि जिल्ह्यातील अन्न आस्थापनांची विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत स्वच्छता व अन्न सुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या नाशिकमधील सहा प्रमुख मिठाई उत्पादक आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे अन्न व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
तपासणीत काय आढळले
प्रत्यक्ष पाहणीत अन्नपदार्थ तयार करताना आणि हाताळताना प्रचंड अस्वच्छता आढळली. उत्पादन क्षेत्रात अस्वच्छ परिस्थिती होती, अन्नावर झुरळे आढळली आणि अन्न सुरक्षा व मानके नियमांच्या अनुसूची ४ मधील तरतुदींचे अत्यंत गंभीर उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या बाबींमध्ये कोणतीही कुचराई खपवून घेतली जाणार नाही, अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे.
अन्नपदार्थ तयार करताना काटेकोर स्वच्छता राखणे, जागेची योग्य व्यवस्था ठेवणे, कीटकांचा प्रादुर्भाव रोखणे आणि अन्न सुरक्षा कायद्याचे पालन करणे हे सर्व व्यावसायिकांसाठी बंधनकारक आहे. नियम मोडणाऱ्यांवर नियमित तपासणी करून कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
कोणत्या आस्थापनांवर कारवाई
भद्रकालीतील एका आस्थापनेवर छापा टाकून संशयित अन्नसाठा जप्त करण्यात आला. तेथे अत्यंत अस्वच्छ परिस्थितीत अन्नपदार्थ तयार केले जात असल्याचे तपासणीत दिसले आणि तयार साठा अप्रमाणित असल्याचा संशय आल्याने जप्तीची कारवाई करण्यात आली. परवाने निलंबित झालेली आस्थापने पुढीलप्रमाणे आहेत : सिर्वी स्वीट्स, देवळाली कॅम्प; कृष्णा सागर स्वीट्स, अशोका मार्ग; पंचम स्वीट्स, तिडके कॉलनी; साई बिकानेर स्वीट्स, ओझर; उत्तम फरसाण अँड स्वीट्स, भगूर; आणि प्रणिता इंडिक फूड्स, भद्रकाली.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply