दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रवीण स्वामी यांनी बुधवारी पंचायत समिती सभागृहात तातडीची आढावा बैठक घेतली. प्रलंबित पाणीपुरवठा योजना, टँकरचे प्रस्ताव, विहीर अधिग्रहण, चारा छावण्या आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न या बैठकीत चर्चेला आला. केवळ कागदोपत्री नियोजन न करता प्रत्यक्ष उपाययोजनांना गती देऊन नागरिकांना दिलासा द्यावा, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
१६ खेडी योजना लवकर सुरू करण्याची सूचना
तालुक्यातील १६ खेडी पाणीपुरवठा योजनेच्या सध्याच्या स्थितीवर बैठकीत विशेष चर्चा झाली. या योजनेच्या वीज जोडणीचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. उर्वरित तांत्रिक कामे तातडीने पूर्ण करून ही योजना लवकरात लवकर कार्यान्वित करावी, अशी सूचना आमदार स्वामी यांनी केली.
टंचाईग्रस्त गावांमधील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन टँकरचे प्रस्ताव प्रलंबित न ठेवता तातडीने मंजूर करावेत, असेही त्यांनी सांगितले. आवश्यकतेनुसार पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचे अधिग्रहण करावे, असे निर्देश देण्यात आले. दुष्काळामुळे पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असल्याने चारा छावण्यांचे नियोजन आणि प्रशासकीय तयारी आतापासूनच ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.
कर्जमाफी प्रकरणे प्रलंबित ठेवू नयेत
या बैठकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्नही चर्चेला आला. बँकांकडून अनावश्यक कागदपत्रांची मागणी किंवा तांत्रिक कारणांमुळे पात्र शेतकऱ्यांची प्रकरणे प्रलंबित ठेवू नयेत, असे आमदार स्वामी यांनी स्पष्ट केले. बैठकीस उपविभागीय अधिकारी संतोष ननवरे, तहसीलदार रणजितसिंह कोळेकर, सभापती पल्लवी जानकर, उपसभापती अमोल पाटील, ॲड. दीपक जवळगे, सलीम शेख, पंडित ढोणे आदी उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply