कवी कुसुमाग्रजांची ‘स्वप्नांची समाप्ती’ ही कविता वाचल्यानंतर वि. स. खांडेकरांना त्यांच्या प्रतिभेची जाणीव झाली होती. प्रचंड ऊर्जा असलेल्या या कवीची प्रतिभा वाया जाऊ नये म्हणून खांडेकरांनी ‘सारथी’ मासिकात त्यांना संपादकपदी घेण्याची मागणी केली होती, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी केले. कुसुमाग्रज प्रतिष्ठान आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा सभागृहात शनिवारी हा कार्यक्रम झाला.
दोघांमधील समान धागा
‘वि. स. खांडेकर आणि कुसुमाग्रज — साहित्यिक सहोदर’ या विषयावर लवटे यांनी दोघांमधील साहित्यिक साम्य अधोरेखित केले. सुरुवातीला दोघांमध्ये पुरेशी ओळख नसली तरी त्यांच्यात साहित्याचा समान धागा होता, असे ते म्हणाले. दोघेही काकांना दत्तक गेले होते आणि दोघांच्या नावांमध्ये ‘विष्णू’ हा सामायिक संदर्भ होता. दोघांची तुलना करणे योग्य नाही, कारण दोघांनी आपापल्या क्षेत्रात हिमालयासारखे कार्य केले आहे, असेही त्यांनी नमूद केले. कुसुमाग्रज कलात्मकदृष्ट्या श्रेष्ठ ठरले, तर खांडेकरांनी आपल्या लेखणीतून खितपत पडलेला ग्रामीण भाग अत्यंत प्रभावीपणे मांडला. मिथक शास्त्राचा समान दुवा दोघांमध्ये आढळतो, कारण खांडेकरांनी ‘ययाती’ तर कुसुमाग्रजांनी ‘देवयानी’ आणि ‘शर्मिष्ठा’ यांसारख्या कलाकृती निर्माण केल्या. शिवाय दोघांनीही वैश्विक साहित्याचे विपुल वाचन केले होते.
ज्ञानपीठाची आठवण
एका आठवणीला उजाळा देताना लवटे म्हणाले, वि. स. खांडेकरांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर कोल्हापुरात झालेल्या सत्कार समारंभाला कुसुमाग्रज उपस्थित होते. त्यावेळी खांडेकरांनी या शालीचा खरा हक्कदार कुसुमाग्रजच असल्याचे नमूद केले होते. विशेष म्हणजे त्यानंतर कुसुमाग्रजांनाही ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ. दिलीप धोंडगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर प्रमुख कार्यवाह ॲड. राजेंद्र डोखळे यांनी सूत्रसंचालन केले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply