ओमानच्या किनाऱ्याजवळ एका व्यावसायिक जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला आहे. या जहाजावर एकूण १४ भारतीय नागरिक होते. त्यापैकी उर्वरित १३ जणांची सुरक्षित सुटका करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. ओमानमधील लिमाह गावाजवळ सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. अल-जुसूफी असे हल्ला झालेल्या जहाजाचे नाव आहे.
दूतावासाचे लक्ष, मृतदेह मायदेशी आणण्याची प्रक्रिया
सध्याच्या परिस्थितीवर ओमानमधील भारतीय दूतावास लक्ष ठेवून आहे. बचावलेल्या भारतीय नागरिकांना तसेच मृत खलाशाचे पार्थिव मायदेशी पाठविण्यासाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधण्यात आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे. या प्रकरणी आवश्यक ती सर्व मदत केली जात आहे.
भारताकडून हल्ल्याचा निषेध
भारताने या हल्ल्याचा निषेध केला आहे. या प्रदेशात व्यावसायिक जहाजांवर सातत्याने होत असलेले हल्ले चिंताजनक असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. या भागातील तणाव कमी व्हावा आणि पुन्हा शांतता व स्थैर्य प्रस्थापित व्हावे, यासाठी सुरू असलेल्या चर्चेतून राजनैतिक तोडगा निघावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. व्यावसायिक जहाजे आणि नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे तातडीने थांबले पाहिजे, तसेच आंतरराष्ट्रीय जलमार्गातील वाहतूक आणि व्यापार विनाअडथळा पूर्वपदावर आला पाहिजे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply