क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या गौरवदिनानिमित्त कोठारी येथे भव्य मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर मातोश्री कमलाबाई डमके इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रविवारी, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत होणार आहे. आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे), वर्धा आणि स्वामी प्रॉपर्टीज अँड डेव्हलपर्स, गोकुंदा यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित केले आहे.
कोणत्या विभागांतील तज्ज्ञ असणार
या शिबिरात नेत्ररोग, अस्थिरोग, मेडिसिन, शस्त्रक्रिया, बालरोग, स्त्रीरोग, मुखरोग, त्वचारोग, कान-नाक-घसा आणि आयुर्वेद अशा विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करणार आहेत. मोतीबिंदू, सांधेदुखी, मणक्यांचे विकार, मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग, पोटाचे विकार तसेच महिला व बालकांच्या आरोग्यविषयक समस्यांवर निदान आणि उपचारांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
तपासण्या आणि योजनेचे मार्गदर्शन
गरजेनुसार सोनोग्राफी, एक्स-रे, रक्ततपासणी, ईसीजी, सीटी स्कॅन आणि एमआरआय यांसारख्या तपासण्या केल्या जाणार आहेत. आवश्यक शस्त्रक्रियांसाठी तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पात्र रुग्णांना पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तालुक्यातील नागरिकांनी आधारकार्ड आणि रेशनकार्ड सोबत आणावे, असे आवाहन आयोजक विशाल स्वामी गोणेवार यांनी केले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply