नंदुरबार जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने सोमवारी दुपारी खळबळ उडाली. न्यायालयाचा परिसर तातडीने रिकामा करण्यात आला आणि न्यायालयीन कामकाज तात्पुरते थांबवण्यात आले. धमकीच्या ई-मेलमध्ये जिल्हा न्यायालय दुपारी ३.११ वाजता उडवून देण्याचा इशारा देण्यात आला होता.
ई-मेल मिळताच न्यायालय प्रशासनाने तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील आणि शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे अधिकारी तत्काळ न्यायालय परिसरात दाखल झाले. बॉम्बशोधक पथक आणि श्वान पथकही घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यानंतर न्यायालयाच्या इमारतीतील प्रत्येक दालन, परिसर आणि पार्किंगची जागा अशा सर्व भागांची कसून तपासणी सुरू करण्यात आली.
सुमारे तीन तास तपासणी, काहीही संशयास्पद नाही
सुमारे दोन ते तीन तास न्यायालय परिसरात कसून तपासणी करण्यात आली. या तपासणीत परिसरात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. तपासणी पूर्ण होईपर्यंत संपूर्ण न्यायालय परिसर रिकामा ठेवण्यात आला होता. न्यायालयीन कर्मचारी, वकील आणि नागरिक यावेळी आवाराबाहेर थांबले होते.
ई-मेल कोणी पाठवला याचा तपास सुरू
सदरचा ई-मेल कोणी पाठवला आणि कुठून पाठवला गेला, याबाबतचा तपास सायबर पोलीस करत आहेत. सर्वांच्या सुरक्षिततेसाठी न्यायालयाची इमारत रिकामी करण्यात आली होती, असे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष मनोज मोरे यांनी सांगितले. पोलिसांनी केलेल्या तपासणीनंतर तिथे कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply