नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाची नूतन इमारत बॉम्बने उडवून देण्याची धमकी असलेला ई-मेल सोमवारी सकाळी मिळाल्याने एकच खळबळ उडाली. धमकीच्या ई-मेलची गंभीर दखल घेत दहशतवादविरोधी पथक, बॉम्ब शोधक-नाशक पथक आणि शहर गुन्हे शाखेच्या पथकांनी तातडीने न्यायालयात धाव घेतली. सुमारे साडेपाच तास संपूर्ण न्यायालय परिसर आणि इमारत कसून तपासल्यानंतर काहीही आक्षेपार्ह न आढळल्याने पोलीस व न्यायालयीन प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान, नाशिकसह ठाणे, सातारा यांसह राज्यातील ८ ते १० जिल्हा न्यायालयांनाही अशाच स्वरूपाचे धमकीचे ई-मेल आल्याचे समोर आले आहे.
दुपारी ३.११ वाजता स्फोटाची धमकी
जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर सोमवारी सकाळी अज्ञात व्यक्तीकडून आलेला ई-मेल पाहताच अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. या ई-मेलमध्ये दुपारी ३.११ वाजता नाशिक जिल्हा न्यायालयाची इमारत बॉम्बने उडवून दिली जाईल, अशी थेट धमकी देण्यात आली होती. प्रकाराची माहिती तात्काळ प्रधान जिल्हा न्यायाधीशांना देण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी लगेचच शहर पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले.
कामकाज थांबवून इमारतींचा ताबा
धमकीची माहिती मिळताच बॉम्ब शोधक-नाशक विभागाचे पथक आणि अल्फा व लकी या दोन प्रशिक्षित श्वानपथकांसह न्यायालयात दाखल झाले. परिमंडळाचे उपायुक्त, शहर गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त, सरकारवाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांच्यासह गुन्हे शाखेची विविध पथके घटनास्थळी पोहोचली. प्रधान न्यायाधीशांच्या सूचनेनुसार वरिष्ठ व कनिष्ठ न्यायालयांतील सर्व कामकाज तातडीने थांबवण्यात आले. वकील, पक्षकार आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवून सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण इमारतींचा ताबा घेतला.
दुपारी १ ते सायंकाळी ५.३० पर्यंत तपासणी
दुपारी १ वाजल्यापासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत पोलिसांनी मुख्य नवीन इमारत, जुनी इमारत, सत्र न्यायालयाची दुसरी इमारत, वकिलांचे मारुती चेंबर्स आणि संपूर्ण वाहनतळ परिसर पिंजून काढला. प्रशिक्षित श्वानांनी प्रत्येक न्यायदान कक्ष, मजले व संशयित वस्तूंची बारकाईने तपासणी केली. मात्र, तपासणीअंती कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. तपासणी सुरू असताना न्यायालयाच्या दोन्ही मुख्य प्रवेशद्वारांवर पोलिसांनी अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. आवारात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केली जात होती. वकील, पक्षकार आणि महिलांच्या बॅगांची झडती घेतली जात होती. तसेच दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या डिक्की तपासूनच सर्वांना आत सोडले जात होते. या प्रकरणी पोलिस आता धमकीचा ई-मेल पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply