सोमवार, २ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

सिन्नरच्या ६२ गावांना टँकरने पाणी; ९९ गावांत विंधन विहिरी

कमी पावसामुळे सिन्नर तालुक्यात टंचाईची चाहूल लागताच पंचायत समितीने कृती आराखडा तयार केला आहे. जून २०२७पर्यंत ६२ गावे व ३५२ वाड्यांना टँकरने पाणी दिले जाणार आहे.

सिन्नरच्या ६२ गावांना टँकरने पाणी; ९९ गावांत विंधन विहिरी

सिन्नर तालुक्यात अल्प पावसामुळे टंचाईची चाहूल आत्तापासूनच जाणवू लागली आहे. त्यावर मात करण्यासाठी पंचायत समितीने टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. जून २०२७ अखेरपर्यंत ६२ गावे आणि ३५२ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्याचे धोरण आखले आहे. त्यासाठी किमान २१ कोटी रुपये खर्च येणे अपेक्षित आहे. दरम्यान, येत्या दोन महिन्यांत तालुक्यात ९९ गावांत विंधन विहिरी खोदण्याचे नियोजन आखले आहे.

टप्प्याटप्प्याने टँकरचे नियोजन

ऑक्टोबर ते डिसेंबर अखेरपर्यंत १४ गावे आणि १३१ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आहे. पांगरी बुद्रुक, पांगरी खुर्द, निऱ्हाळे, पाटपिंप्री, भोकणी, कहांडळवाडी, मिठसागरे, केपागनर, धुळवाड, खोपडी बुद्रुक, खोपडी खुर्द, कणकोरी, मनेगाव आणि रामनगर या गावांना टंचाईची झळ सर्वात आधी बसण्याचा अंदाज आहे. या टप्प्यात किमान ३५ हजार लोकसंख्येला पाणी पुरवठा होऊ शकेल. एप्रिल ते जून २०२७ या महिन्यांत टंचाईची तीव्रता सर्वाधिक जाणवणार आहे. या कालावधीत किमान ३९ गावे आणि १६३ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठ्याची वेळ पडणार आहे. आमदार माणिकराव कोकाटे, तहसीलदार सुरेंद्र देशमुख आणि गटविकास अधिकारी अशोक भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. येत्या तीन दिवसांत त्यावर चर्चेसाठी पंचायत समितीत विशेष बैठकही होणार आहे.

विंधन विहिरींचा उपाय

टंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी तालुक्यात अनेक वर्षांनंतर प्रथमच विंधन विहिरींचे नियोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील विविध गावांत प्राथमिक शाळांच्या आवारात या विंधन विहिरी घेतल्या जाणार आहेत. याद्वारे टंचाईची झळ कमी करण्याचे प्रयत्न होणार आहेत. दरम्यान, भूजल पातळी खालावल्यास हे नियोजन कोलमडण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. टंचाईची झळ जाणवू लागल्याने रामनगर आणि पाटोळे या दोन गावांनी टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर केले आहेत. हे प्रस्ताव मंजुरीसाठी तहसील विभागाकडे देण्यात आले आहेत. दिवाळीनंतर या गावांना टँकर सुरू होण्याचा अंदाज आहे.

स्रोत: मूळ बातमी

प्राची शिंदे

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance