नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील सर्व व्यवहार ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आडतदारांमार्फत हे व्यवहार होणार असल्याने त्यामध्ये पारदर्शकता येऊन शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक टाळण्यास मदत होईल, अशी माहिती बाजार समितीच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष गणेश गिते यांनी दिली.
प्रशासक मंडळाच्या सभेत महत्त्वाचे निर्णय
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात प्रशासक मंडळाची दुसरी सभा नुकतीच २९ तारखेला पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी गणेश गिते होते. या बैठकीस प्रशासक मंडळाचे सदस्य बाळासाहेब सानप, बापू पिंगळे, सचिन ढिकले, प्रभारी सचिव विजय निकम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बाजार समितीचा कारभार गतिमान आणि पारदर्शक करण्यासह विविध विकासकामांना या वेळी मंजुरी देण्यात आली. सभेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत गीते यांनी निर्णयांची माहिती दिली.
बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतचा अधिकृत प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना गणवेश वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. अनुकंपा तत्त्वावरील पाच प्रकरणांपैकी कन्हैया पिंगळे यांच्या पत्नीला सेवेत सामावून घेण्यास मंजुरी देण्यात आली.
विकासकामे आणि उत्पन्नात वाढ
पंचवटी व दिंडोरी रोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डमध्ये बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा तत्त्वावर अत्याधुनिक विद्युत वाहन चार्जिंग केंद्र उभारण्यात येणार आहे. आवारातील स्वच्छता व सुविधांच्या व्यवस्थापनासाठी सुलभ शौचालय या संस्थेसोबत अधिकृत करार केला जाणार आहे. पेठ रोडवरील जुन्या प्रशासकीय इमारतीचे रखडलेले बांधकाम पुन्हा सुरू करण्यासाठी ४१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, येत्या चार महिन्यांत काम पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मार्केट यार्डातील वजनकाटा पूर्ववत सुरू करणे, सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, साफसफाईच्या कामाची निविदा काढणे तसेच फ्रूट मार्केटमधील ३० गाळ्यांचे बांधकाम अशा विविध विषयांवरही चर्चा झाली. व्यापारी संकुलातील उर्वरित गाळ्यांचे बांधकाम पूर्ण करून शेतकऱ्यांच्या मुलांसाठी नाममात्र दरात वसतिगृह उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू असल्याचे गीते यांनी सांगितले. बाजार समितीचा कारभार हाती घेतल्यापासून अवघ्या महिनाभरात समितीच्या उत्पन्नात सुमारे ६५ लाख रुपयांची वाढ करण्यात यश आले आहे. यापुढील काळातही उत्पन्नाचे स्रोत वाढवून शेतकऱ्यांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे गीते यांनी सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply