दिवाळी म्हणजे आनंद, उत्साह आणि घरगुती फराळाची मेजवानी. नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणानिमित्त घरापासून दूर राहणाऱ्या मुलांना आणि नातेवाइकांना घरच्या फराळाची चव मिळावी, यासाठी टपाल विभागाची पार्सल सेवा उपयोगी ठरत आहे. चकली, चिवडा, लाडू, करंजी, शंकरपाळे आणि मिठाई यांसारखे पदार्थ टपाल सेवेद्वारे देशाच्या कानाकोपऱ्यात तसेच परदेशातही पाठविता येणार आहेत.
देशांतर्गत पार्सलचे शुल्क
टपाल विभागाच्या दरपत्रकानुसार ५०० ग्रॅमपर्यंतच्या पार्सलसाठी स्थानिक पातळीवर २८ रुपये, राज्यांतर्गत ६५ रुपये, तर अन्य राज्यांत पाठविण्यासाठी ७२ रुपये शुल्क आकारले जाते. १ ऑगस्ट २०२६ पासून पार्सलचे सुधारित दर लागू झाले आहेत. त्यानुसार दोन ते पाच किलो वजनाच्या पार्सलसाठी नवीन शुल्क आकारले जात आहे. अन्य राज्यांत पाच किलो वजनाचे पार्सल पाठविण्यासाठी ५१५ रुपये मूळ शुल्क असून त्यावर लागू जीएसटी आकारला जाणार आहे. हिंगोली शहरातील मुख्य टपाल कार्यालयासह पार्सल बुकिंगची सुविधा असलेल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये बुकिंग करता येणार आहे. फराळ व्यवस्थित आणि सुरक्षित पद्धतीने पॅक करून पाठविणाऱ्याचे व स्वीकारणाऱ्याचे संपूर्ण नाव, पत्ता, पिनकोड आणि मोबाइल क्रमांक नमूद करावा. टपाल कार्यालयात पार्सलचे वजन केल्यानंतर त्यानुसार शुल्क निश्चित केले जाईल.
शंभरहून अधिक देशांत सुविधा
परदेशात राहणाऱ्या नातेवाइकांनाही दिवाळीचा आनंद देता यावा यासाठी आंतरराष्ट्रीय टपाल सेवेचा पर्याय उपलब्ध आहे. अमेरिका, कॅनडा, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनसह शंभरहून अधिक देशांत फराळ व भेटवस्तू पाठविण्याची सुविधा आहे. मात्र प्रत्येक देशाचे खाद्यपदार्थ आयातीसंदर्भातील नियम वेगवेगळे असल्याने पार्सल पाठविण्यापूर्वी संबंधित देशाचे नियम, पदार्थांचे स्वरूप, पॅकिंग आणि वजन यांची माहिती घेणे आवश्यक आहे. दहा किलो वजनाच्या आंतरराष्ट्रीय पार्सलसाठी ऑस्ट्रेलिया १९,९१२ रुपये, सिंगापूर ४,३७८ रुपये, रशिया ६,७५० रुपये, दुबई ३,४९३ रुपये, यूके ६,४५१ रुपये, कॅनडा ९,६७६ रुपये, चीन ६,०९५ रुपये आणि जर्मनी ५,८७६ रुपये असे दर आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply