छत्रपती संभाजीनगरमध्ये वेगाने वाढणारी औद्योगिक गुंतवणूक, अजिंठा-वेरूळसह लाभलेला समृद्ध पर्यटन वारसा आणि वाढती लोकसंख्या या तिन्ही बाबींचा एकत्रित विचार करून शहराच्या विकासाचे दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. उद्योगांमुळे निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधी, पर्यटनातून स्थानिक अर्थव्यवस्थेला मिळणारी चालना आणि भविष्यातील नागरी गरजा लक्षात घेऊन रस्ते, सार्वजनिक वाहतूक, टाऊनशिप, हरित क्षेत्रे तसेच आरोग्य व शैक्षणिक सुविधांचा विस्तार करावा लागेल, असे मत उद्योग क्षेत्रातील जाणकार रसदीपसिंग चावला यांनी व्यक्त केले आहे.
पर्यटन वारशाचे अपुरे ब्रँडिंग
औद्योगिक गुंतवणूक, जागतिक दर्जाचा पर्यटन वारसा आणि वाढती लोकसंख्या या तिन्हींचा समतोल साधला गेला, तर छत्रपती संभाजीनगर पुढील दशकात देशातील आघाडीच्या टियर-२ शहरांपैकी एक म्हणून उदयास येऊ शकते, असा विश्वास चावला यांनी व्यक्त केला. मात्र उद्योगांचा विस्तार आणि लोकसंख्या वाढ या वेगाने पायाभूत सुविधांचा विस्तार झालेला दिसत नाही. त्यामुळे भविष्यातील लोकसंख्या लक्षात घेऊन स्वतंत्र आणि नियोजनबद्ध शहर उभारण्याची हीच वेळ असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. शहराकडे अजिंठा-वेरूळ लेणी, घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, बीबी का मकबरा आणि पाणचक्की यांसारखा जागतिक दर्जाचा ऐतिहासिक व धार्मिक वारसा असूनही त्याचे ज्या प्रमाणात ब्रँडिंग व्हायला हवे होते आणि सुविधा विकसित व्हायला हव्या होत्या, त्या झालेल्या नाहीत. विशेषतः अजिंठ्याकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या सुविधा यामुळे परदेशी पर्यटकांची संख्या कमी झाली आहे. पर्यटन हे केवळ स्थळांपुरते मर्यादित नसून ते संपूर्ण स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारे माध्यम आहे; हॉटेल, रेस्टॉरंट, वाहतूक, हस्तकला, मार्गदर्शक सेवा आणि स्थानिक बाजारपेठ या सर्व क्षेत्रांना पर्यटनामुळे मोठी संधी मिळू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिर्डीचे भाविक आणि सिडकोच्या धर्तीवर शहर रचना
शिर्डी आणि छत्रपती संभाजीनगर यांच्यातील उत्तम रस्ते संपर्काचा अधिक प्रभावी वापर करण्याची गरज असून शिर्डीला येणाऱ्या लाखो भाविकांपैकी मोठा वर्ग अजिंठा, वेरूळ आणि घृष्णेश्वरकडे वळवण्यासाठी राज्य शासन, पर्यटन विभाग आणि उद्योग संघटनांनी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पार्किंग, वाहतूक आणि पर्यटक व्यवस्थापनाचे नियोजन आतापासूनच करणे गरजेचे आहे. दोन दशकांपूर्वी शहराची ओळख रुंद रस्ते, स्वच्छता आणि हिरवाई अशी होती; आता टोयोटासह विविध मोठ्या औद्योगिक प्रकल्पांमुळे लाखो रोजगार निर्माण होणार आहेत. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर नवीन लोक शहरात स्थायिक होतील. त्यामुळे नवीन रस्ते, नियोजनबद्ध टाऊनशिप, हरित क्षेत्र, शाळा, आरोग्य सुविधा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यांचे नियोजन आताच करावे लागेल, तसेच सिडकोने विकसित केलेल्या वसाहतींच्या धर्तीवर आधुनिक, मोकळी आणि शाश्वत शहर रचना उभारावी, असेही चावला यांनी सांगितले.
कापूस उद्योगासमोरील आव्हाने आणि इतर शहरांकडून धडा
कापूस उद्योगातील बदलांचा आढावा घेताना महाराष्ट्रातील एमएच-१ कापसाने दर्जेदार उत्पादन, आधुनिक जिनिंग आणि ब्रँडिंगमुळे जागतिक बाजारपेठेत स्वतंत्र ओळख निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले. मात्र वाढलेली किमान आधारभूत किंमत, आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि घटती निर्यात ही उद्योगांसमोरील मोठी आव्हाने आहेत. शेतकऱ्यांना केवळ हमीभाव वाढवण्यापेक्षा उत्पादनवाढीसाठी दर्जेदार बियाणे, आधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनाची गरज असून भाव अंतर योजना प्रभावीपणे राबवली गेल्यास शेतकऱ्यांनाही फायदा होईल आणि उद्योग अधिक स्पर्धात्मक बनेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. अयोध्या, वाराणसी आणि तिरुपती ही शहरे एका धार्मिक स्थळामुळे प्रसिद्ध झाली, तर उज्जैनने महाकाल कॉरिडॉरमुळे पर्यटनात मोठी झेप घेतली. त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगरकडे एकाच परिसरात अनेक जागतिक दर्जाची आकर्षणे असून त्यांचे प्रभावी ब्रँडिंग, सुयोग्य नियोजन आणि आधुनिक सुविधा उभारल्यास हे शहर देशातील आघाडीच्या टियर-२ शहरांमध्ये निश्चित स्थान मिळवू शकेल, असा विश्वास चावला यांनी व्यक्त केला.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply