राज्य सरकारच्या लेक लाडकी योजनेच्या अर्ज प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे. आता लाभार्थ्यांना महाडीबीटी २.० पोर्टलवरून थेट ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. यासोबतच आवश्यक कागदपत्रांची संख्याही कमी करण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे.
पूर्वीची प्रक्रिया कशी होती?
यापूर्वी अर्जदारांना जवळच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन अर्ज जमा करावा लागत होता. त्यानंतर हे अर्ज प्रकल्प स्तरावर एकत्रित करून तत्कालीन पोर्टलवर नोंदवले जात होते. पुढे छाननी आणि मंजुरीची प्रक्रिया पूर्ण केली जात होती. अंगणवाडी केंद्रात प्रत्यक्ष जाणे अनिवार्य असल्यामुळे अनेक लाभार्थ्यांना अडचणी येत होत्या.
नव्या व्यवस्थेत काय बदलले?
शासनाच्या विविध योजनांच्या सुसूत्रीकरणाच्या सूचनांनुसार या योजनेसाठी नवीन शासन प्रक्रिया पुनर्रचना तयार करण्यात आली आहे. त्याअंतर्गत अर्ज नोंदणी, छाननी, मंजुरी आणि लाभ मंजुरी या प्रक्रिया सुसूत्र करण्यात आल्या आहेत. अर्ज नोंदणीपासून अर्जाची सद्यस्थिती पाहण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया आता ऑनलाइन झाली आहे. ज्या भागांत अंगणवाडी केंद्र कार्यान्वित नाही, तेथील लाभार्थ्यांनाही याचा फायदा होणार आहे. राज्यातील कोणत्याही भागातील रहिवासी आता ऑनलाइन अर्ज करू शकतात. लाभाची रक्कम यापूर्वीच थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आतापर्यंत या योजनेअंतर्गत पहिला लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची संख्या २,९८,६९५ इतकी आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply