जुन्नर तालुक्यात शुक्रवारी रात्री झालेल्या पावसाने द्राक्षबागांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फुलोरा आणि पोंगा अवस्थेतील बागांमध्ये घडकूज होण्याचा तसेच वेलींवर तुडतुडे, रस शोषक किडी, डावणी आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे.
किती पाऊस झाला
तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी सरासरी ८.४ मिलिमीटर पाऊस झाला. पिंपळगाव जोगे धरण परिसरात सर्वाधिक १६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ऑक्टोबर महिन्यात तालुक्यात सरासरी ५६.३ मिलिमीटर पाऊस पडतो, मात्र यावर्षी केवळ ८.९ मिलिमीटर म्हणजे सुमारे १५ टक्के पाऊस झाला आहे, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत शेटे आणि तालुका कृषी अधिकारी प्रवीण नंदकुळे यांनी दिली आहे.
तीन हजार एकरांवरील बागा आणि वाढता खर्च
जुन्नर तालुक्यात सुमारे तीन हजार एकर क्षेत्रावर द्राक्ष पीक आहे. २५ सप्टेंबरपासून फळ छाटणी सुरू झाली असून ऑक्टोबर अखेर ती पूर्ण झाली आहे. छाटणीच्या वेळापत्रकानुसार बागा फूट, पोंगा, घड निर्मिती आणि फुलोरा अशा वेगवेगळ्या अवस्थेत आहेत. २५ सप्टेंबरच्या सुमारास छाटणी झालेल्या बागा फुलोरा अवस्थेत असून १५ ऑक्टोबरनंतर छाटणी झालेल्या बागा पोंगा अवस्थेत आहेत. कीड व रोग प्रतिबंधासाठी शेतकऱ्यांनी दुपारनंतर फवारणी सुरू केली असून पुढील दोन-तीन दिवस सलग फवारणी करावी लागणार आहे. त्यामुळे एकरी दहा ते पंधरा हजार रुपयांचा फवारणी खर्च वाढला असल्याची माहिती द्राक्ष उत्पादक हरिभाऊ वायकर आणि अवधूत बारवे यांनी दिली आहे. मागील वर्षी घड निर्मिती अभावी बहुतेक बागांचा हंगाम वाया गेला होता, तर यावर्षी घड निर्मिती समाधानकारक झाली आहे. मात्र पाऊस, ढगाळ वातावरण आणि वाढलेली आर्द्रता द्राक्ष पिकाला मारक ठरत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply